सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथे गजबजलेल्या वस्तीत भक्षाच्या शोधत असलेल्या बिबट्याने कुत्र्याला भक्ष केले आहे. शहराला लागून जंगल भाग असून या भागात वन्य प्राणी राहतात. बिबट्याचाही वावर या ठिकाणी असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते. माठेवाडा येथील डोंगराच्या मध्यरात्रीच्या सुमारास भक्षाच्या शोधात असलेल्या बिबट्याने डोंगरातून मदारी मार्गे माठेवाड्यात एंट्री केली. माठेवाड्यातील डॉ. कार्लेकर यांच्या कंपाऊंडमध्ये बिबट्या घुसल्याने कुत्र्यांनी ओरड केली.
यावेळी सीसीटीव्ही पाहिले असता विचित्र जनावराचा आवाज येत होता. तसेच कुत्रे मोठमोठ्याने भुंकत होते. बिबट्याने येथील पाळीव कुत्र्यावर झडप घालून त्याला घेऊन पलायन केले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच बिबट्याचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केली आहे. बिबट्या प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्याचा आवाज ऐकू येत आहे.