
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गोव्यातील वेलीम येथील बिरबल उर्फ राजेश बिश्वजित सील याला दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीची आणि संशयित बिरबल उर्फ राजेश याची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले. त्यानंतर संशयिताने मुलीला फूस लावून गोव्यातील वास्को येथे नेल्याचा आरोप आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शोधमोहीम हाती घेतली व तिचा शोध लावला. या प्रकरणी बिरबल उर्फ राजेश बिश्वजित सील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ४, ८, १२ तसेच पोक्सो कायद्यांतर्गत कलम १३७(२), ६४(१) आणि ६५(१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.










