
दोडामार्ग : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोडामार्ग तालुका उपसंघटक संदेश वरक यांची पक्षशिस्तीचा सातत्याने भंग केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व संघटनात्मक कामकाजावर त्यांनी सतत टीका करत पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्याबाबत वारंवार समज देऊनही त्यांच्या वर्तनात कोणताही सकारात्मक बदल झाला नाही. परिणामी आज झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका प्रमुख व विभाग प्रमुख उपस्थित होते. विशेष म्हणजे, या बैठकीस संदेश वरक हे स्वतःही उपस्थित होते. त्यांच्या उपास्थितीत त्यांचे निलंबन झाले हे विशेष.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षशिस्तीला सर्वोच्च स्थान असून, कोणत्याही व्यक्तीला संघटनेविरोधी काम करण्यास किंवा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास मुभा दिली जाणार नाही, असे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी स्पष्ट केले आहे.










