
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात गेली अनेक वर्षे असणारा रानटी हत्ती प्रश्न थेट सावंतवाडी तालुक्यापर्यंत पोहचला. अलीकडे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी शासन अनुकूल आहे तोच याच भागातील स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. आमचा हत्ती वनतारात नको तिलारीतच राहू दे अशी मागणी पुढे येतं असताना सरकारला दोषीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे मात्र आता हत्ती पकड मोहीम हवी म्हणणारे गेले कुठे असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केला आहे शिवाय ज्यांना तिलारीत हत्ती किंवा अन्य वन्यप्राणी हवेत असे वाटते ते प्राण्यांची योग्य निगा घेऊ शकतात कारण ते अभ्यासक आहेत. तिलारीत शासकीय जागेत प्रतिवनतारा प्रकल्प करण्यासाठी त्यांनी पुढे यावे शासन पूर्ण सहकार्य करेल यासाठी आपण स्थानिक आमदार तसेच वनमंत्री यांची भेट घेईन जेणेकरून तिलारीत पर्यटन बहरेल असेही गवस म्हणाले.
गवस पुढे म्हणाले, तिलारी खोऱ्यात गेली अनेक वर्षे रानटी हत्ती उपद्रव प्रश्न आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांनी शासन, लोकप्रतिनिधी यांना टार्गेट करत अनेकवेळा आंदोलने छेडली अलीकडेच एका हत्तीला पकडण्यासाठी सुतोवाच करण्यात आले तेव्हा तो हत्ती वनतारा येथे नेला जाईल तो तिलारीतच राहावा यावरून शासनावर स्थानिक पातळीवरून टीका सुरु झाली हा विरोधाभास का निर्माण केला जात आहे.
जर तिलारीतील हत्ती किंवा अन्य प्राणी तिलारीत रहायला हवे तर केवळ वनतारावर टीका करून काही साध्य होणार नाही. प्रति वनतारा तिलारीत निर्माण होण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढे यायला हवे शासन त्यांना सहकार्य करेल. पण आता तिलारीतील शेतकऱ्यांनी एक तर पकड मोहीम अन्य जसे हत्ती आहेत तसेच राहू देत पैकी एकच भूमिका घेऊन पुढे यायला हवे. दुटप्पी भूमिकेने प्रश्न सुटणार नाही असेही श्री. गवस म्हणाले.
गवस म्हणाले, आपण यापूर्वीची लोकप्रतिनिधी यांची स्टेटमेंट पाहू शकता. हत्ती ग्राम तिलारीत व्हावे असा आग्रह होता मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी मागणी केली म्हणून हत्ती पकड मोहीम राबविण्याचा विचार पुढे आला अन्यथा हत्तीग्राम ही संकल्पना पुढे आली असती. त्यामुळे उठसुठ शासनावर टीका यापुढे सहन केली जाणार नाही जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांनी शेतकऱ्यांची मते विचारात घ्यावीत नाहक टीका टिप्पणी झाल्यास आम्हीही तसेच उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिलाय.












