
दोडामार्ग : ऐन भात कापणीच्या हंगामात पुन्हा एकदा हत्तींच्या कळपाने हेवाळे परिसरात धडक दिली आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी चंदगड तालुक्यात निघून गेलेले हे हत्ती आता पुन्हा तिलारी खोऱ्याकडे परतले आहेत. त्यामुळे संपूर्ण दशक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिलारी खोऱ्यात हत्तींचा वावर गेल्या काही महिन्यांपासून लक्षणीयरीत्या वाढला आहे. पावसाळ्याच्या काळात या परिसरात हत्तींच्या हालचाली सतत सुरू होत्या. अखेर दीड ते दोन महिन्यांपूर्वी हा कळप चंदगड तालुक्यात गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीची कामे निर्धोकपणे पार पाडता येतील, असा दिलासा घेतला होता. मात्र, शनिवारी रात्री पुन्हा चार हत्तींचा कळप हेवाळे गावाच्या हद्दीत दाखल झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
या कळपात एक मोठी मादी हत्ती, एक लहान मादी आणि दोन पिल्लांचा समावेश असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हे हत्ती उमाजी देसाई यांच्या घरामागील परिसरात फिरताना दिसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. या अचानक पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम व चिंता निर्माण झाली आहे. यंदा पावसाचा हंगाम लांबल्याने भात कापणी आधीच उशिरा सुरू झाली होती. हत्तींचा त्रास नसल्याने शेतकऱ्यांनी उरलेली शेतीकामे निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची अपेक्षा धरली होती. परंतु आता या वन्य पाहुण्यांच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या कष्टाचे पीक पुन्हा संकटात आले आहे. अस्मानी संकट थोडं कमी झाले असताना आता हत्तींच्या या आगमनाने खरी अडचण वाढली आहे. भातपिक शेतात उभे आहे आणि हत्ती कधी येतील, कधी सगळ उध्वस्त करतील याची भीती सतावत असल्यामुळे या हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा. तसेच हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.










