
दोडामार्ग : आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योग उभारणीऐवजी गोल्फ कोर्स प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप करत, “गोल्फ कोर्स आणणारच असाल, तर त्या ठिकाणी स्पोर्ट्स अकॅडमी तरी सुरू करा, म्हणजे स्थानिक तरुणांना खेळासाठी सुविधा उपलब्ध होतील,” अशी तीव्र मागणी जिल्हा काजू उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष विलास सावंत यांनी केली.
आडाळीत उद्योग येण्यासाठी कृती समिती संघर्ष करीत असून, “आमचा त्या संघर्षाला ठाम पाठिंबा आहे. हा प्रकल्प दशक्रोशीच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे,” असेही सावंत यांनी स्पष्ट केले. सावंत म्हणाले, “एमआयडीसीचा मूळ हेतू लघुउद्योजकांना भूखंड आणि सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. आडाळी परिसरातील युवक-युवतींना रोजगारनिर्मितीची सर्वाधिक संधी येथेच निर्माण होणार होती. शासनाचे धोरण प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभारण्याचे आहे; मोठा प्रकल्प आला तरी तो उत्पादननिर्मितीचा असण्याचा नियम आहे. मात्र लोकांनी त्याग केलेल्या जमिनीत धनदांडग्यांसाठी गोल्फ कोर्स आणणे हा भूमिपुत्रांचा विश्वासघात आहे. याचा एकजुटीने विरोध व्हायलाच हवा.”
“गोल्फ सारख्या निष्क्रीय खेळापेक्षा येथे स्पोर्ट्स अकॅडमी निर्माण झाल्यास स्थानिक तरुणांना प्रशिक्षण, नोकरीच्या संधी आणि क्रीडा क्षेत्रात मार्ग मोकळा होईल. गोव्यात असे अनेक प्रकल्प यशस्वी झाले आहेत.”
“गोवा–सिंधुदुर्ग मार्गावर दोन–तीन वर्षांपासून सर्वत्र गोल्फ सिटीचे पोस्टर्स झळकत आहेत. जर एखाद्या गावात खाजगी जमिनी खरेदी करून गोल्फ सिटी बनवली जात असेल, तर आडाळीवरच गोल्फ प्रकल्पाची सक्ती का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.”
तर सावंत यांनी स्थानिक कृषी संपत्तीवर आधारित उद्योगांची तातडीची गरजही अधोरेखित केली. “नारळ, सुपारी, काजू, कोकम, आंबा, अननस, केळी यांसारखी उच्च दर्जाचे उत्पादन देणारी ही भूमी आहे. येथे फूड प्रॉडक्ट्स प्रोसेसिंग उद्योग आले, तर मोठी रोजगारनिर्मिती होईल. तसेच पर्यटन जिल्हा घोषित झालेल्या सिंधुदुर्गात हॉस्पिटॅलिटी व टुरिझम ट्रेनिंग सेंटर उभारणेही महत्त्वाचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.”
तर “डिंगणे परिसरातील अनेकांनी आडाळी एमआयडीसीत भूखंडांसाठी पाच वर्षांपूर्वी अर्ज केले, त्यांना अजून प्रतिसाद नाही. शासन जाणूनबुजून एमआयडीसीच्या मूळ हेतूपासून दूर जात आहे. भूमिपुत्रांनी उठाव करणे गरजेचे आहे; दशक्रोशी त्यांना साथ देईल.” असेही त्यांनी म्हटले आहे.










