
दोडामार्ग : श्री शंतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळेत २८ वर्षांनंतर १९९६-९७ या वर्षाच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा ‘स्नेहमेळावा’ नुकताच २६ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रशालेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात १९९६ - ९७ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी - विद्यार्थिनींनी आपल्या गुरुजनांना आदराने निमंत्रित करून हा समारंभ यशस्वी केला.
यावेळी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक एस. टी. गवस यांच्यासह मुख्याध्यपक अशोक अंबुलकर, माजी मुख्याध्यापक स्नेहल गवस, सदाशिव गवस, शिक्षक सूर्यकांत सांगेलकर एस. एन. गवई, ज्योति परमेकर, विजय देसाई, रविकांत शिरोडकर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. तसेच, प्रशालेतील कर्मचारी लक्ष्मी जाधव (शिपाई), प्रविणा गवस, तळकटकर (शिपाई), विठ्ठल घोटगेकर (लिपिक), सुहास देसाई (लिपिक) यांचीही विशेष उपस्थिती होती.
या स्नेहमेळाव्यासाठी माजी विद्यार्थी संजय गवस, कांचन गवस, आनंद गवस, समीर घाडी, रामचंद्र गवस, फटी गवस, संदीप महालकर, संदीप गवस यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. माजी विदयार्थी कै. कृष्णा नाईक, कै. यशवंत राऊत, कै. सुहास सावंत, कै. दिनेश गवस, आदिना श्रद्धाजंली वाहण्यात आली. उपस्थित सर्व गुरुजन व मान्यवरांचे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने अत्यंत आत्मीयतेने स्वागत करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी, शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि जीवनातील विविध अनुभव कथन केले. गुरुजनांनीही आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तब्बल २८ वर्षांनी एकत्र आल्याने ‘बंध मैत्रीचे’ अधिक घट्ट झाल्याची भावना या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.










