
संदीप देसाई | सिंधुदुर्ग : सहकार क्षेत्रात आदर्श उभारणी करत दोडामार्ग विकास सेवा सोसायटी लि. या संस्थेने अल्प बचतीपासून स्वफंड उभारणीचा आदर्श ठेवला आहे. ०१ एप्रिल २०२२ पासून सुरू झालेल्या अल्प बचत ठेव (पिग्मी) आणि आर.डी. योजनेच्या माध्यमातून संस्थेने केवळ ठेवी गोळा केल्या नाहीत, तर त्या निधीचा उपयोग समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक बळ देण्यासाठी केलाय. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण तालुक्यातील यां संस्थेने पाठपुरवठा केलेल्या चार परमिट टॅक्सी रिक्षाचे चाव्या वितरण कार्यक्रम होणार हे विशेष आहे.
केवळ जिल्हा बँक पतपुरवठा करणार आणि त्यावर आपण आपलं कामकाज चालवणार यावर विसंबून न राहता अध्यक्ष सूचन कोरगावकर यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनखाली सेवा सोसायटीच्या कार्यक्षेतील छोटे मोठे व्यावसायिक, शेतकरी यांच्या साथीने याचा शुभारंभ केला. तेथील भाजीवाले, वडापाव स्टॉलधारक, फळविक्रेते, मच्छीविक्रेते आणि बाजारातील लहान व्यापारी हेच संस्थेचे खरे आधारस्तंभ आहेत, असा संदेश संस्थेने आपल्या कार्यातून प्रत्यक्षात दिला आहे.
संस्थेने आजवर ७५ सभासदांना रु. ९५ लाखांचे कर्जवाटप केले असून वसुलीचा दर तब्बल १०० टक्के आहे! याशिवाय ५३ सभासदांना शेती व मध्यम मुदत कर्ज म्हणून रु. ७५ लाखांचे वितरण करण्यात आले असून, प्रत्येक वर्षी शेतीकर्जाची पूर्ण फेड होत असल्याने संस्थेच्या विश्वासार्हतेत अधिक भर पडली आहे.
फक्त दोन वर्षांत संस्थेने १ कोटी रुपयांच्या ठेवी गोळा करून स्वफंड बळकट केले आहे. चेअरमन सुचन कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली संस्था आज खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाचा नवा अध्याय लिहित आहे.
संस्थेतून पिग्मी संकलन, आवर्त ठेव योजना, शेती व उद्योग कर्ज वितरण, तसेच सीएससी सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध सेवा पुरविल्या जात आहेत. अनेक सभासदांनी या संस्थेच्या पतपुरवठ्याचा उपयोग करून स्वतःचे लघुउद्योग सुरू केले असून, ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे नवे द्वार खुले झाले आहे.
सोमवारी संस्थेच्या माध्यमातून चार लाभार्थ्यांना चार परमिट टॅक्सी रिक्षांचे वितरण करण्यात येणार आहे. असा उपक्रम स्वफंडातून राबविण्याचा दुर्मीळ आदर्श अन्य सेवा सोसायटीसाठी ठरणार आहे. दोडामार्ग तालुक्यातच नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी स्वयंपूर्ण वाटचाल करणाऱ्या यां सोसायटीचे विशेष कौतुक होत आहे. अजूनही ६ ते ८ शेतकरी सभासद या योजनेतून स्वयंरोजगार निर्मिती साठी प्रतीक्षा यादीत असल्याचे सांगत त्यांनाही सेवा सोसायटी सहकार्य करणार असल्याचही कोरगावकर यांनी म्हटलंय. “ही तर केवळ सुरुवात आहे… अजून मोठा पल्ला गाठायचा आहे,” असा दृढ मनोदय संस्थेचे अध्यक्ष सुचन कोरगावकर यांनी व्यक्त केला.
सेवा सोसायट्या ग्रामीण अर्थकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू..
मोठ्या उद्योजकाना अर्थ पुरवठा करण्यासाठी सर्वच ठिकाणी बँका, पतसंस्था कार्यरत आहेत. मात्र गावच्या लघु उद्योजक, व्यवसाय उभारणाऱ्या सर्वसामान्य सभासदांना अशा बँका अनेक सेवा शर्ती, अटी नियम घालून टाळाटाळ करतात. मात्र ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सेवा सोसायटी, विविध कार्यकारी सोसायटी यांना आता अनेक गोष्टी करण्यासाठी केंद्रसारकारने पाठबळ दिलंय. त्यामुळे संचालक मंडळाने याचा अभ्यास करून अशा योजना आपल्या सेवा सोसायटी मार्फत राबविल्यास प्रत्येक गावाचा, गावातील शेतकरी व त्यांच्या मुलांना उद्योग, व्यवसाय, शेतकरी, बागायतदार यां साऱ्यांना मदत होऊन ग्रामीण अर्थकारण अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास सूचन कोरगांवकर यांनी कोकणसाद शी बोलताना व्यक्त केली.










