आमदार केसरकरांचे होर्डिंग काढले

कार्यकर्ते संतप्त
Edited by: लवू परब
Published on: September 12, 2025 18:53 PM
views 231  views

दोडामार्ग : शहरात आमदार दीपक केसरकर यांचे उभारण्यात आलेले होर्डिंग काढण्यात आल्याने संतप्त बनलेल्या शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयात धडक देत प्रशासनाला त्याचा जाब विचारला. यावेळी दोन वर्षांपूर्वी परवानगीसाठी अर्ज दिला होता. मात्र, तरीही त्यावर प्रशासनाने कारवाई न करता उलट ती होर्डिंग काढली असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणन आहे.  अखेर संतप्त शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे नमते घेत जाहिरात विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत पिरणकर यांनी दिलगिरी व्यक्त करत जाहिरात शुल्क भरणा करण्याचे लेखी पत्र दिले व काढलेले होर्डिंग पुन्हा बसविण्याचे आश्वासन देताच कार्यकर्ते शांत झाले. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत यशस्वी शिष्टाई केली.

 दोडामार्ग शहरात आमदार दीपक केसरकर यांचे होर्डिंग्स काही दिवसांपूर्वी नगरपंचायत प्रशासनाने अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून काढून नेले. तर तहसील कार्यालयासमोरील लोखंडी फ्रेम काढण्यात आली होती. त्यामुळे शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले याचा जाब विचारण्यासाठी तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नगरपंचायत कार्यालयावर धडक दिली. यावेळी राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, सूर्यकांत गवस, बाळा नाईक, प्रेमानंद देसाई, संदीप गवस यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने जाहिरात विभागाचे प्रमुख लक्ष्मीकांत पिरणकर व इतर अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यात आला. कोणत्या कारणामुळे हे होर्डिंग तुम्ही अनधिकृत ठरवलात असा प्रश्न उपस्थित करताच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे होर्डिंग काढण्यात आल्याचे पिरणकर यांनी सांगितले. मात्र, कोणत्याही प्रकारची पंच यादी घातलेली नाही, शिवाय या होर्डिंगची उंची व पृष्ठभाग हा नियमात असताना तो अनधिकृत तुम्ही कसा काय ठरविलात अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना शिवसैनिकांनी धारेवर धरले. अखेर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत या प्रश्नी त्यांच्याशी चर्चा केली.

अखेर प्रशासनाकडून जाहिरात कराची रक्कम भरणा करण्याचे लेखी पत्र पिरणकर यांनी दिल्यानंतर व काढलेले होर्डिंग पुन्हा बसविण्यात येतील असे आश्वासन दिल्यावर शिवसैनिक शांत झाले.