नगराध्यक्षांच्या 'चोराच्या उलट्या बोंबा'

संतोष नानचे यांचं चेतन चव्हाण यांना प्रत्युत्तर
Edited by: लवू परब
Published on: September 11, 2025 19:23 PM
views 475  views

दोडामार्ग : ब्रम्हा, विष्णू महेश यांचे आशीर्वाद आणि लक्ष्मीचे मातेच दर्शन यामुळेच मंजूर झालेला शहराचा प्रारूप विकास आराखडा नामंजूर होण्याची किमया झाली. तर हा शहराचा प्रारूप विकास आराखडा माझ्या अडीच वर्षाच्या कालावधीत झालेला नाहीय. तर तो विद्यमान नगराध्यक्ष यांच्या कार्यकाळात झाला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष चव्हाण यांच्या "चोराच्या उलट्या बोंबा आहेत". येणारी निवडणूक डोळ्या समोर ठेवुन आमच्यावर हे खोटे आरोप आहेत असं सांगत भाजपचे नगरसेवक संतोष नानचे यांनी भाजपचेच नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

दोडामार्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गुरुवारी संतोष नानचे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष चव्हाण यांनी केलेल्या आरोपांच खंडन केले. यावेळी  नगरसेवक रामचंद्र ठाकूर, सोनल म्हावळंकर, पांडुरंग बोर्डेकर यांसह विजय मोहिते, प्रकाश काळबेकर, फोंडू हडीकर, ओंकार पेडणेकर, प्रमोद परमेकर, हनुमंत खरवत, शिवम पांचाळ, सिद्धेश बोडेकर, दीपक म्हावळंकर, बाळा रेडकर आदी त्यांचेसोबत उपस्थित होते. श्री. नानचे पुढे म्हणाले की, कसई – दोडामार्ग शहराचा शहरविकास आराखड्या संदर्भात काल नगराध्यक्ष व त्यांचे सहकारी यांनी नानचे नगराध्यक्ष असताना आराखडा तयार करण्यात आला या त्यांच्या 'चोराच्या उलट्या बोंबा' असा प्रकार केला आहे. मी नगराध्यक्ष असताना आम्ही शहराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व ठराव घेतले होते व त्यादृष्टीने आम्ही काम करीत होतो. मात्र प्रारूप शहर विकास आराखडा हा माझ्या अडीच वर्षाचा कालावधीमध्ये तयार झाला नसून तो चव्हाण यांच्याच कालावधीमध्ये तयार करण्यात आला आहे. दिनांक २८.०७.२०२३ च्या प्रारूप शहर विकास आराखड्या संदर्भात चर्चा करणेसाठी घेतलेल्या सभेमध्ये आम्ही आमची स्पष्ट भुमिका मांडली होती की, शहर विकास आराखडा तयार करण्या अगोदर प्रभाग निहाय सभा आयोजित करून त्याची माहिती शहरातील सर्व नागरीकांना देण्यात यावी. तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षकवर्ग, प्रमुख सामाजिक कार्यकर्ते यांची एक सभा घेवून त्यांच्यासोबत चर्चासत्र करण्यात यावी. याचा उद्देश एकच होता तो म्हणजे शहरातील प्रत्येक नागरीकांपर्यंत प्रारूप शहर विकास आराखड्याची माहिती पोहोचेल व सर्वजण त्यामध्ये आपला सहभाग दर्शवतील शहरातील राज्यमार्ग १८९ (दोडामार्ग -भेडशी) शासनाच्या मालकीचा २५ मी. रुंदीचा आहे तो तेवढ्याच रूंदीचा ठेवण्यात यावा, बाजारपेठेतील व्यापारांचा विचार करता बायपास रस्ते काढण्याऐवजी आहे त्याच मुख्य रस्त्यांची आवश्यक तेवढे रूंदीकरण सर्वांना विश्वासात घेवून करणे, कसई गावठण धाटवाडी, म्हावळंकरवाडी व इतर भागात याठिकाणी जुनी लोकवस्ती घरे आहेत तो भाग फॉरेस्ट न दाखवता निवासी झोन दाखविण्यात यावा, शहरातील नागरीकांच्या मालकीच्या जागांवर अन्यायकारक आरक्षण नको अशा अनेक सुचना शहराच्या विकासाच्या हिताच्या दृष्टीने केल्या होत्या मात्र त्या सूचना इतिवृत्तामध्ये न घेता त्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे दि.०६.०२.२०२४ रोजीच्या सभेमध्ये आम्ही प्रारूप शहर विकास आराखडयाला कडाडून विरोध केला व शहरातील नागरीकांवर अन्याय करणाऱ्या, नागरीकांच्या जमिनीवर अनावश्यक आरक्षण टाकून लोकांची जमिन हडप करणाऱ्या प्रारूप शहर विकास आराखड्याविरोधात मत नोंदविले होते असेही नानचे यांनी स्पष्ट केले. 

पैशांसाठी गद्दारी करणाऱ्यांनी आमची बदनामी करू नये....

आम्ही खासदार राणे व प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य करतो. एक लोकप्रतिनिधी म्हणुन आम्ही दोडामार्गच्या जनतेशी व आपल्या पक्षाशी नेहमीच प्रामाणिक राहिलो आहोत. मात्र ज्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये पैशांसाठी पक्षाशी गद्दारी केली ते आम्ही शिंदे गटात जाणार म्हणून आमची नाहक बदनामी करीत आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते आहोत. आपला देश व पक्षासाठी त्याग व समर्पण करणे हे आमच्या रक्तात पुर्वीपासून आहे. त्यामुळे कुणी कितीही त्रास दिला, बदनामी केली तरी त्यांना आम्ही पुरून उरणार आहोत. आज एक भुमिका घ्यायची व वैयक्तिक स्वार्थासाठी उद्या दुसरी भुमिका घ्यायची अशी आम्हाला सवय नाही. त्यामुळेच कालच्या दि.०९.०९.२०२५ रोजीच्या सभेमध्ये पण आम्ही आमची सुरूवातीपासुनची जी भुमिका होती तीच मांडली. आम्ही शहरवासियांवर अन्यायकारक असणाऱ्या शहर विकास आराखड्याला विरोध केला. ते करीत असताना ज्यांनी हा आराखडा तयार करून दि.०६.०२.२०२४ च्या सभेमध्ये मंजूर केला होता त्यांना कालच्या सभेमध्ये सदरचा शहर विकास आराखडा नामंजूर करण्याची सुबुध्दि झाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व शहरविकास आराखडा नामंजूर करणेत यावा हि भुमिका कायम ठेवली. त्यात कुणाला वाईट वाटण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र आमच्या लोकप्रियतेचा धसका घेवून व्देष करणाऱ्यांना विनाकारण  

लक्ष्मीच्या प्रलोभनाने आराखडा रद्द करण्याची सुबुद्धी...

यावेळी नानचे यांनी खुलासा केला की, त्रिमूर्तीतील श्री. देव ब्रह्मा विष्णू महेश मधील महेश यांनी स्वतः धनदेवता असलेली लक्ष्मी ची गाठभेट घालून दिली. केवळ लक्ष्मीच्या प्रलोभनासाठी आराखडा रद्द करण्याचा मानस त्यांनी आता धरलेला आहे. यापूर्वी यांनीच या आराखड्याला बहुमताने संमती दिली होती असा खळबळजनक आरोप नानचे यांनी केला आहे. 

आम्ही सभेचा त्याग केला नाही...

दरम्यान, नानचे म्हणाले की, आम्ही सभेला जाण्यापुर्वीच ठरवून होतो की यापुर्वीचा वाईट अनुभव पाहता सभा सुरू झाली की, अन्यायकारक अशा शहरविकास आराखडयाविरोधात मत मांडून ओरोस येथील दुसऱ्या सभेसाठी जायचे. त्यामुळे आम्ही सभेमधून गेल्यानंतर मागाहून कोणी आम्हाला काहीही बोलले तरी आम्ही त्याला काडीचीही किंमत देत नाही .

पदाचा वापर लोकहितासाठी सोडून माझी बदनामी करण्यासाठी..

कसई दोडामार्ग शेवटचे सरपंच व पहिले नगराध्यक्ष म्हणून काम करीत असताना त्या पदांची नेहमीच गरिमा राखली व लोकहिताचे काम केले. म्हणून कसई दोडामार्गची जनता आम्हाला पुन्हा पुन्हा निवडून देते. कसई दोडामार्ग धाटवाडीतील गणपती विसर्जन स्थळाच्या घाटपायऱ्या तोडणाऱ्यांनी, किरकोळ स्वार्थासाठी साक्षात श्री गणेशाचं विसर्जन स्थळ जेसीबी लावून तोडणाऱ्यांनी आमची लायकी काढण्याअगोदर स्वतःची काय लायकी शिल्लक उरली आहे की नाही हे एकदा शहरात फिरून पाहावे. मिळालेल्या पदाचा वापर फक्त संतोष नानचे ला त्रास देण्यासाठी करणाऱ्यानी अगोदर आपली लायकी तपासून पाहावी व नंतरच बोलावे. कायम स्वतःला सक्षम आहे म्हणून सांगणाऱ्यांनी सोबतच्या निकृष्ट कामे करणाऱ्या नगरसेवकांची बेनामी ठेकेदारी अगोदर बंद करून दाखवावी.  नगरपंचायतच्या सर्व सफाई कामगारांचा दीड महिन्याचा पगार व एक वर्षाचा पीएफ कुणी खाल्ला ते अगोदर जाहिर करावे. टक्केवारी व हफ्तेखोरी व घर चालविणाऱ्यांनी आमच्या नादाला लागू नये.

भाजप जिल्हाध्यक्षांवरही नाराजी व्यक्त

आम्ही भाजप पक्षामध्ये खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळे प्रवेश केला. मी स्वतः संतोष नानचे, सोनल म्हावळंकर आम्ही गेल्या चार वर्षांपासून भाजपचे नगरसेवक आहोत. असे असले तरी आम्हाला चार वर्षांपासून विरोधकांची वागणूक मिळत आहे. तसेच सध्या दोडामार्ग नगरपंचायतमध्ये जे काही प्रकार घडत आहेत. ते अयोग्य असून आम्हाला कोणीही विश्वासात घेत नाही. नगरपंचायत प्रशासनामध्ये नगराध्यक्षांसह काही नगरसेवकही आपला मनमानी कारभार करत आहेत. या सर्व घडत असलेल्या प्रकारांबाबत जिल्हाध्यक्ष लक्ष घालीत नसल्याने यात वाढ होत चालली आहे असा गंभीर आरोप नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी केलाय.