
दोडामार्ग : दोडामार्ग शहरात काल रात्री पिंपळेश्वर सार्वजनिक गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असता गांजा ओढणाऱ्या गोव्यातील २ युवकांकडून भर गर्दीमध्ये पेटलेले फटाके उडविण्याचा प्रकार घडला. त्याची माहिती पोलिसांना देण्यात येताच संबंधित युवकांनी धूम ठोकली.
याबाबत अधिक माहिती अशी की काल रविवारी सायंकाळी उशिरा धुळामार्क शहरातील पिंपळेश्वर सार्वजनिक गणपतीच्या भव्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सुरुवातीला ही मिरवणूक खालची धाटवाडी या ठिकाणी गेली होती. तिथून आल्यानंतर पिंपळेश्वर चौक मार्गे बस स्थानक दिशेने सुरू झाली होती. गोवा रोडवरील जुने पोलीस दुरक्षेत्र परिसरात मिरवणूक पोहोचली असता लगतच्या पार्किंग मध्ये असलेल्या घोळक्यातील एक - दोन युवकांकडून पेटते फटाके उडवण्याचा प्रकार घडला.
एक फटाका तर थेट सचिन इलेक्ट्रिकल्स या दुकाना शेजारी उभ्या असलेल्या रहिवाशांच्या पायालगत येऊन पडला. आसपासच्या रहिवाशांनी दम देताच या युवकांनी तिथून पळ काढला. त्यानंतर या युवकांनी पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या अलीकडे पुन्हा तसाच प्रकार केला. त्यावेळी तेथील रहिवाशांनी पोलिसांना याची कल्पना देताच पोलीस ऍक्शन मोड वर आले. मात्र ते पाहताच सदर युवकांनी आपापल्या बाईक घेऊन तिथून पोबारा केला. सदर युवक हे गोव्यातील तसेच नशेमध्ये होते अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.










