
दोडामार्ग : शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नुकतीच जिल्ह्यातील तालुक्यांतील कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख पदी पुन्हा एकदा गणेशप्रसाद गवस यांचीच निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शिवसेना कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यावेळी पुन्हा एकदा झोळंबे गावातील गणेशप्रसाद गवस यांचीच तालुकाप्रमुख पदी फेर निवड करण्यात आली आहे. गणेशप्रसाद गवस यांची पक्षाप्रती असलेली तळमळ व गावागावांत शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी केलेली कामगिरी लक्षात घेऊन पक्ष श्रेष्ठींनी व जिल्हाप्रमुख संजू परब यांनी परत एकदा गवस यांनाच संधी दिली आहे.
येणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणुका तसेच नगरपंचायत निवडणुकांत गवस यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना ही संधी दिली असल्याचे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. यावेळी गवस म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकांत सर्वांना सोबत घेऊन पक्षासाठी आवश्यक ते सर्व काम केले जाईल. व पक्ष तालुक्यात एक नंबरवर कसा येईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार असल्याचे गवस यांनी स्पष्ट केले.
निंबाळकर, दळवी यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती...
शिवसेनेच्या जिल्हा समन्वयक पदावर काम केलेल्या शैलेश सुरेश दळवी यांची पक्षाने आता उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली आहे. तर राजेंद्र निंबाळकर यांचीही परत उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात पक्षासाठी जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.