शिंदे सेनेचं सहकार्य नाही म्हणून भाजपात : सुमन डिंगणेकर

Edited by: लवू परब
Published on: August 18, 2025 19:08 PM
views 77  views

दोडामार्ग : काही दिवसांपूर्वी साटेली भेडशीत तणावाच्या घटना घडल्या होत्या. यावेळी भाजपच्या दोडामार्ग पदाधिकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले. मात्र, एवढा गंभीर विषय होऊनही शिंदे शिवसेनेने आम्हाला सहकार्य केले नाही म्हणून आम्ही भाजप पक्षात प्रवेश केल्याचे साटेली भेडशी उपसरपंच सुमन डिंगणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संदर्भात साटेली - भेडशी ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून मी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छिते की ग्रामपंचायत निवडणूक ही ग्राम विकास पॅनल म्हणून लढविण्यात आली होती. मी ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून निवडणून आल्यावर आम्ही साटेली - भेडशी ग्राम विकास पॅनल म्हणून एकत्र राहिलो तसेच साटेली - भेडशी  ग्रामपंचायत सरपंच सदस्य कोणत्याही पक्षाची म्हणून जाहीर करण्यात आली नव्हती तसेच मी आणि माझे पती हे शिवसेनेच्या शिंदे गट या पक्षाबरोबर कार्यरत होतो. सदर मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी गावात काही तणावाच्या घटना घडल्या. संघर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले परंतु ज्या पक्षात मी आणि माझे पती काम करत होतो त्या शिवसेनेतील एकही पदाधिकारी आमच्या पाठीमागे राहिला नाही अशी खंत व्यक्त करत आम्ही सर्वांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याच त्यांनी सांगितलं.