
दोडामार्ग : मागील सहा दिवसांपासून जंगलात वावरणाऱ्या हत्तींनी त्यांचा मोर्चा कोलझर गावाकडे वळविला. येथील फळबागायतीत घुसून शेतकऱ्यांच्या नारळ व केळी बागायतीचे अतोनात नुकसान केले. यात शेतकरी अनिल देसाई, रुपेश वेटे, मेघशाम देसाई, श्रीधर देसाई या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तळकट पंचक्रोशीत सहा हत्तींचा कळप वावरत आहे. मागील सहा दिवसांपासून या हत्तींचा वावर येथील जंगल परिसरात होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे या हत्तींचा मागोवा काढण्यातही वन विभागाने नेमलेल्या पथकाला यश मिळत नव्हते. हे हत्ती शनिवारी पहाटेच्या सुमारास कोलझर परिसरात दाखल झाले. येथील शेतकऱ्यांच्या फळबागायतीत घुसून माड उध्वस्त केले. केळींचा फडशा पाडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिसरात हत्तींचा वाढता वावर पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.