
दोडामार्ग : कुडासे खुर्द येथील पाल पुनर्वसन शाळेच्या आवारात एक अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण केला आहे. अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत अंगणवाडी केंद्रात घुसून तोडफोड केली तसेच अंगणवाडीच्या आत लघुशंका करून परिसरात अत्यंत असभ्य आणि निंदनीय वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हा प्रकार गुरुवारी पहाटे लक्षात आला. अंगणवाडीच्या परिसरात दारूच्या बाटल्या, विमलचे पॅकेट आणि नशेसंबंधित इतर साहित्य सापडल्याने हा प्रकार कोणत्यातरी नशेत धुंद असलेल्या व्यक्तींचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळेच्या आवारात अशा प्रकारचे निंदनीय वर्तन झाल्याने शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी यांच्यावर मानसिक तणाव निर्माण झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. श्रद्धा नाईक, उपसरपंच राजेंद्र गवस, गावचे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग गवस तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे सुरक्षेचे वातावरण बिघडले असून, पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सरपंच श्रद्धा नाईक यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ग्रामसुरक्षा दल सक्रिय करण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे.
"शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आहे. येथे असे असभ्य आणि घृणास्पद प्रकार घडणे अत्यंत निंदनीय आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर याचा विपरीत परिणाम होतो," अशी प्रतिक्रिया एका शिक्षकांनी दिली.
पोलिसांची कारवाईची मागणी ग्रामस्थ, पालक आणि शाळा प्रशासन यांनी याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.