
दोडामार्ग : वायंगणतड येथील आराध्या अभय नाईक हिने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत आराध्याने ३०० पैकी २७२ गुण मिळवले.
यापूर्वी तिची सांगेली नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. तिची मोठी बहीण अनुष्का ही देखील नवोदय विद्यालयात नववीत शिकत आहे. तिच्या पावलावर पाऊल ठेवत आराध्याने शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या दोन्ही परीक्षेत यश मिळविले. ती एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून अफाट बुद्धीमत्तेने आराध्याने मिळविलेल्या या यशाचे कौतुक होतं आहे. तिला तेथील शिक्षक डॉ. उत्तम तानावडे, वडील अभय नाईक, आई अपर्णा नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. दोडामार्गचे गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गुरुदास कुबल व सदाशिव पाटगावकर यांनीही तिचे कौतुक केले आहे.