कसई - दोडामार्ग शहरात प्लास्टिक बंदी लागू

नगरपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय | शहरवासीयांनी पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे ; नगरपंचायतीचे आवाहन
Edited by: dodamarg
Published on: July 11, 2025 18:40 PM
views 70  views

दोडामार्ग : कसई - दोडामार्ग शहरामध्ये पर्यावरण रक्षण आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी नगरपंचायत मार्फत शहरात प्लास्टिक वापरावर बंदी लागू करण्यात आली आहे. यानंतर कोणत्याही प्रकारच्या सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, साठवणूक किंवा विक्रीस नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात परवानगी नाही.नगरपंचायतीच्या वतीने याबाबत दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, फेरीवाले व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली असून, प्लास्टिकच्या ऐवजी कापडी, कागदी पिशव्या व बायोडिग्रेडेबल पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्याकरीता कसई - दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या मार्गदर्गनाखाली फिरत्या पथकाद्वारे दोडामार्ग शहरातील स्थानिक व्यापारी, फळविक्रेते, फुलविक्रेते, मच्छी विक्रेते, किराणा दुकाने, बेकरी, पान स्टॉल अशा दोडामार्ग बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आले. मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक लक्ष्मीकांत पिळणकर, संजय शिरोडकर, सिद्धेश शेगले, सरेश गवस, सुर्यनारायण गवस, प्रमोद कोळेकर, अंकुश कदम हि पथकाने कार्यवाही केली.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी सांगितले की, “शासनाच्या अधिसूचनेनुसार शहरात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या वेळी ₹५००, दुसऱ्यांदा ₹२००० व नंतर ₹५००० इतका दंड आकारण्यात येईल.” तसेच हा दंड प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांन हा दंड आकारण्यात येईल.  शहरातील अनेक व्यावसायिकांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करावा व प्लास्टिकमुक्त शहर घडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.