
दोडामार्ग : कोलझर ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य हे नाहक बेलगाम आरोप करत आहेत. आपण कोणताही मनमानी कारभार अथवा कोणत्याही प्रकरणात भ्रष्टाचार केला नाही आहे. आपल्यावर बिनबुडाचे आरोप करून उपसरपंच व सदस्य हे ग्रामपंचायती बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांची ही कृती कायद्याला धरून नसून त्यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी कोलझर सरपंच सुजल सूर्यकांत गवस यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी कोलझर ग्रामवासीयांनी गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांची भेट घेत उपसरपंच व सदस्य यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी दोडामार्ग शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोलझर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुजल गवस यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा गैरवापर करत बेकायदेशीररीत्या दाखला देणे, नळपाणी योजनेचे साहित्य भंगारात विक्री करून आर्थिक गैरव्यवहार करणे, ग्रामपंचायतमध्ये शिपाई भरती बेकायदेशीर करणे आदी आरोप करत त्यांना अपात्र करण्यात यावे या मागणीसाठी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर कोलझर उपसरपंच, काही ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांनी उपोषण छेडले होते. या सर्वाला उत्तर देण्यासाठी आज सरपंच सुजल गवस व अनेक ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर करत सर्व आरोप खोडून काढले आहेत. यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, कोलझर सरपंच सुजल गवस, तालुका संघटक गोपाळ गावस, तिलकांचन गवस, रत्नकांत कर्पे, सूर्यकांत गवस, बबलू पांगम, विलास सावंत, ग्रा. पं. सदस्य प्रिया देसाई, उर्मिला देसाई, यशवंत शिरवलकर, बाबाजी नागरे, जयवंत देसाई, विशाखा गवस, आकांक्षा गवस, अंकिता गवस यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
शिपाई भरती नियमानेच करण्यात आली....
ग्रामपंचायत कर्मचारी पद भरतीबाबत ग्रामपंचायतकडून ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ६१ नुसार दिलेल्या अधिकारानुसार व कर्मचारी सेवेच्या अटीशर्ती, नियम १९६० मधील तरतुदीचे पालन करण्यात येऊन तब्बल 4 मासिक सभेत चर्चा करण्यात येऊन बहुमताने व छाननी पात्र ठरल्याने श्रद्धा उल्हास देसाई यांची मासिक सभेने शिपाई म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि त्यास चार विरुद्ध तीन अशा मताने नियुक्ती आदेश देण्यात आलेला असून सदर बहुमताने झालेला ठराव उपसरपंच, सदस्य यांना मान्य नसेल तर त्याची कृती ग्रामपंचायत कायद्याच्या विरुद्ध असून त्यांच्यावर कलम ३९ च्या उपक्रम १ अंतर्गत अपात्रतेची कार्यवाही प्रास्ताविक करण्यात यावी अशी मागणी यावेळी सरपंच, ग्रामस्थ व उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.
दिलेला दाखला हा वस्तुस्थिती पाहून दिला आहे............
सरपंच म्हणून मी एका व्यक्तीला सर्व्हे क्र.६ हिस्सा नं. १ ते १४ या क्षेत्रामध्ये कोणत्याही स्वरुपाची इमारत नसल्याबाबत दाखला देण्यात आलेला असून गावचे प्रथम नागरिक म्हणून सत्य वस्तूस्थितीची पहाणी करण्यात येऊन दाखला देण्यात आलेला आहे. आणि सदर खरेदी खताला माझे पती साक्षीदार आहे, असे उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे. परंतु कायद्यानुसार कोणताही व्यक्ती हा जमीन विक्री करणाऱ्या व्यक्तीला साक्षीदार होऊ शकतो आणि माझे पती त्या खरेदीखताला साक्षीदार झाले म्हणून माझा त्यांचाशी संबंध सोडला जात आहे. हे चुकीचे आहे आणि मी दिलेला दाखला हा वस्तुस्थिती पाहून दिलेला आहे. त्यामुळे सदरच्या दाखल्याबाबत उपसरपंच व सदस्य यांच्याकडून करण्यात येणारा आरोप चुकीचा आहे.
बॉक्स
कोणताही गैरव्यवहार केला नाही........
आर्थिक गैरव्यवहार केलेल्या आरोपाबाबत सदर नळपाणी योजनेचे साहित्य-विक्री करण्याचा ठराव हा मी पदावर येण्यापूर्वीच्या सरपंच व कार्यकारी यांनी केलेला आहे. आणि त्यानुसार ग्रामपंचायतीचे सचिव यांच्यावर पुढील कार्यवाही करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार सचिव यांनी कारवाही करून नाळ योजनेचे साहित्य विक्री करण्यात आलेले आहेत. आणि सदर विक्रीतून आलेली रक्कम ग्रामपंचायत खात्यावर भरणा करण्यात आलेली आहेत. व सदर साहित्य- विक्रीचे मुल्यांकन देखील घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे सदर साहित्य विक्रीतून कोणताही आर्थिक गैरव्यवहार करण्यात आलेला नाही. त्यामुळे उपसरपंच व सदस्य हे विनाकारण ग्रामपंचायतीची बदनामी करत असून उपसरपंच व सदस्य करत असलेले कृत्य व बदनामी हि कायद्याला धरून नाही त्यामुळे त्यांचावर ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ उपकलम १ नुसार अपात्रतेची कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
फोटो –
दोडामार्ग – गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांना निवेदन देताना कोलझर सरपंच सुजल गवस, सोबत गणेशप्रसाद गवस व अन्य.
छाया – लवू परब