संमती पत्रात खाडाखोड

तत्कालीन मुख्याधिकारी वैभव साबळेंवर आरोप
Edited by: लवू परब
Published on: June 27, 2025 11:55 AM
views 810  views

दोडामार्ग : सांगली मनपा मध्ये सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी अटक झालेल्या उपायुक्त वैभव साबळे यांचे दोडामार्ग मधील सुद्धा कारनामे उघडकीस येत आहेत. दोडामार्ग नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना साबळे यांनी  एका जमीन मालकाच्या संमती पत्रात खाडाखोड करून त्याचा गैरवापर केला. या गंभीर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी दोडामार्ग शहरातील वैभव उल्हास गवस यांनी जिल्हा पोलीस प्रमुख सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व लाच लुचपत प्रतिबंध विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे. दरम्यान, यामुळे दोडामार्ग नगरपंचायतमध्ये कमालीची खळबळ उडाली आहे.

इमारतीचा बांधकाम परवाना देण्यासाठी सात लाख रुपयांची लाच मागितलेल्या वैभव विजय साबळे याला तेथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक करून त्याची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. साबळेच्या अटकेचे वृत्त पसरतात वेंगुर्ले तसेच दोडामार्ग मधील नागरिकांनी एकच जल्लोष केला होता. दोडामार्ग मधील सुद्धा त्याचे कारनामे आता हळूहळू बाहेर येत आहेत. शहरातील खालची धाटवाडी येथील वैभव गवस याची आई व अन्य काही जणांनी आपल्या वहिवाटीतील काही क्षेत्र रस्त्यासाठी एका संमती पत्राद्वारे कसई दोडामार्ग नगरपंचायतला दिले होते. परंतु त्या संमती पत्रामध्ये पेनाने खाडाखोड करून अन्य चुकीचा उल्लेख या साबळेने केला. शिवाय अन्य गंभीर गोष्टी देखील या खाडाखोडी द्वारे करण्यात आल्या आहेत. त्या संमती पत्रामुळेच नगरपंचायतने अलीकडेच बनवलेल्या शहर विकास आराखड्यात जमिनीतील बरेचसे क्षेत्र घुसडले  आहे. त्या पार्श्वभूमीवर साबळे यांनी केलेल्या या गंभीर प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणी वैभव गवस व त्याच्या आईने केली असून या प्रकाराने दोडामार्गात कमालीची खळबळ उडाली आहे.