
दोडामार्ग : वझरे हळदीचा गुंडा येथील पुलाचे काम पूर्ण झाल्याचे पत्र बांधकाम विभागाने एसटी महामंडळाला दिले नसल्याने दोडामार्ग - विर्डी बससेवा बंद होती. यामुळे मुलांच्या शैक्षणिक नुकसान होत असल्याने उभाठा जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी बांधकाम विभाग सावंतवाडी येथे जाऊन पुलाचे काम पूर्ण झाल्याचे पत्र घेऊन एसटी विभागाला दिल्या नंतर दोडामार्ग एसटी बससेवा सुरु करण्यात आली. यावेळी स्वतः बाबूराव धुरी यांनी एसटी बस मधून विर्डी पर्यत प्रवास करून दोडामार्ग विर्डी रस्ता वाहतुकीस योग्य आहे हे प्रत्यक्ष दर्शी पहिले.
वझरे हळदीचा गुंडा येथे पुलाचे काम सुरु असल्यामुळे एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती. ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना पर्यायी रस्ता केला. मात्र, तो रस्ता मान्सून पूर्व पावसात वाहून गेला यामुळे तळेखोल, विर्डी या गावांचा संपर्क तुटला. त्याचबरोबर दोडामार्ग - विर्डी ही बसफेरीही गेले अनेक महिने बंद होती, १६ जुन पासून शालेय वर्ष सुरु झाले विर्डी,तळेखोल, वझरे आदी गावातील अनेक मुले ही दोडामार्ग येथे शिक्षणासाठी जातात पण ही बसफेरी बंद असल्याने या मुलांची मोठी गैरसोय होतं होती, एस टी नियंत्रक यांचेकडे चौकशी केली असता पूल पूर्ण झाल्याचे पत्र बांधकाम विभागाने आगार प्रमुखांना दिले नाही असे सांगण्यात आले. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन व मुलांचे शैक्षणिक नुकसान तसेच लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी तातडीने याप्रश्नात लक्ष घातले व सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी येथे सकाळ पासून ठाण मांडून सदरचे पत्र आगार व्यवस्थापक यांना द्यायला लावले व संध्याकाळची दोडामार्ग -विर्डी बसफेरी सुरु करायला भाग पाडले. सदरची बस संध्याकाळी ६:३० वाजता दोडामार्ग स्थानाकातून विर्डीला जाण्यास मार्गस्थ झाली त्या बस मध्ये बसून बाबुराव धुरी विर्डी पर्यंत गेले व रस्ता प्रवासासाठी सुखकर असल्याचे त्यांनी केवळ सांगून नाही तर आपल्या वर्तनातून दाखवून दिले. या बसफेरीचे विर्डी येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच या बसचे वाहक,चालक यांनाही पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बाबुराव धुरी यांसोबत शिवसेना पदाधिकारी विभागप्रमुख विजय जाधव, विभागप्रमुख लक्ष्मण जाधव, माजी युवासेना प्रमुख भिवा गवस यांसह असंख्य विर्डी वासिय उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबुराव धुरी म्हणाले, सत्तेत असो किंवा नसो समाजासाठी व माझ्या माणसासाठी झटत राहणे हे मी माझं कर्तव्य मानतो, मला माझ्या लोकांच्या समस्या दिसतात, त्या मी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्ता धाऱ्यांनी तालुक्याला पोरका केला आहे त्यांची जबाबदारी स्वीकारून काम करत राहणं हा आपला एक कलमी कार्यक्रम असल्याचे यावेळी बाबुराव धुरी म्हणाले.