शिरंगे गौण खाणी विरोधात खानयाळे ग्रामस्थांचा एल्गार

काळ्या दगडाच्या खाणी बंद करण्यासाठी ग्रामस्थांची 'आर या पार' ची लढाई
Edited by: संदीप देसाई
Published on: March 06, 2025 20:14 PM
views 143  views

दोडामार्ग : तिलारी धरण क्षेत्राच्या परिसरात असलेल्या शिरंगे गावातील काळ्या दगडाच्या गौण खाणी कायमस्वरूपी तत्काळ बंद करा, या मागणीसाठी खानयाळे ग्रामस्थांनी धरणालगत असलेल्या शीव परिसरात ईशारा दिल्या नुसार गुरुवारी सकाळपासून साखळी उपोषणास सुरु केलं आहे. या नंतर महसूल विभागाने उपोषणकर्त्याना योग्य ती कारवाई करू असे लेखी आश्वासन देत समजूत काढण्याचा  प्रयत्न केला. मात्र, उपोषणकर्ते खानयाळे ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच येथे येऊ दे अशी जोरदार मागणी करत उपोषण सुरू ठेवले आहे. 

खानयाळे ग्रामस्थांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शिरंगे या जुन्या गावी तिलारी धरणाला लागुन काळया दगडाचे गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात राजरोसपणे चालू आहे. ते तात्काळ बंद करणेबाबत निवेदन दिलेले होते. २१ फेब्रुवारी रोजी पोलिस निरीक्षक दोडामार्ग यांनी पोलिस पाटील खानयाळे यांचेमार्फत तोंडी बोलावून आमचे म्हणणे ऐकूण घेतले.  त्यानंतर गौण खनिजचे उत्खनन अध्यापही बंद करण्यात आलेले नाही. धरण बुडीत क्षेत्रालगत असलेल्या या दगड खाण उत्खनन क्षेत्राची त्रयस्थ अधिकारी, प्रसार माध्यम प्रतिनिधी व आमचे प्रतिनिधी यांचे समक्ष पाहणी व मोजणी करुन परवाना दिलेले भूमापन क्रमांक व सध्या उत्खनन चालू असलेले भूमापन क्रमांक यांची खातर जमा केलेले नाही. त्यामुळे गुरुवारपासून उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनास दिला. 

 मात्र, प्रशासनाने यावर तोडगा न काढल्याने ग्रामस्थांनी धरण परिसरालगत असलेल्या शिरंगे येथील शीव परिसरात गुरुवारी सकाळपासून साखळी उपोषणास सुरुवात केली. सायंकाळी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, महसूल नायब तहसीलदार वैशाली राजमाने, मंडळ अधिकारी राजन गवस उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी शिरंगे धरण परिसरातील खाणी बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठविल्याचे लक्ष्मण कसेकर यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. आपणास अहवाल नको तर खाणी तात्काळ बंद करा आणि जर तुमच्याकडे अधिकार नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांना येथे बोलवा. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील बोलवा असे उपोषणकर्त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले.

उत्खननानचे मोजमाप करा

शिरंगे गावात किती खाणी अधिकृत आहेत? असे उपोषणकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर यांना विचारले असता एकूण पाच खाणे असून त्यापैकी चार खाणींना परवानगी दिल्याचे कसेकर म्हणाले. यावेळी अनधिकृत असलेल्या एका खाणीवर का कारवाई झाली नाही? असा सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला. सर्व खाणींचे मोजमाप करून याखाणी तात्काळ बंद करा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली. आपल्या मागण्या वरिष्ठांपर्यंत आम्ही पोहोचवू असे अधिकाऱ्यांनी उत्तर देत माघारी फिरले. 

अन्यथा माळीण सारखी घटना घडेल

परवानगी दिलेल्या खाणी आपण मुद्दाम पहाव्यात अशी विनंती उपोषणकर्त्यांनी केल्याने अधिकाऱ्यांनी खाणींची पाहणी केली. यावेळी धरणाला लागूनच असलेल्या खाणी अधिकाऱ्यांना दाखवल्या. धरणालगतचा डोंगर अक्षरशः उभा कापला असून भविष्यात हा डोंगर खचून माळीणसारखी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तुम्हा अधिकाऱ्यांच्या केवळ महसूल जमा करण्याच्या हव्यासापोटी आम्हा ग्रामस्थांना प्राणास मुकावे लागणार असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. यावेळी अधिकारी मात्र निरुत्तर झाले.