
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अशातच गुरुवारी दुपारी गाराही बरसल्या. दुपारनंतर काही क्षण विश्रांती घेत पाऊस टप्प्याटप्प्याने जोरदार लागला. यावेळी जोरदार वाराही सुटला होता. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने तालुका वासीय मात्र सुखावले आहेत.
हवामान खात्याने गुरूवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. गुरूवारी सकाळपासूनच वातावरणातील उष्मा वाढला होता. गरमीने तालुका वासीय हैराण झाले होते. दुपारी १ वा.च्या सुमारास ढग दाटून आले. त्यानंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या व पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट सुरू झाला. यावेळी जोरदार वाराही सुटला होता. २ वा.च्या सुमारास पाऊस कोसळला. गाराही बरसल्या. झरेबांबर व इतर ठिकाणी गारा पडल्या. त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. अर्धा तास लागलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले.
पुन्हा पाऊस थांबला. ३ वा.च्या सुमारास विजेचा कडकडाट सुरू झाला अन् पाऊस कोसळू लागला. जवळपास तासभर जोरदार पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. पावसामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला.