दोडामार्ग मोर्ले ते किल्ले पारगड रस्ता सुस्थितीत ; प्रशासनाचे आभार

उर्वरित रस्ता कामासाठी निधीची मागणी
Edited by:
Published on: April 08, 2026 15:57 PM
views 73  views

दोडामार्ग : किल्ले पारगड व इसापूर, मोर्ले, घाटगेवाडी, केर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने राज्य महामार्ग क्र. १८७ (मोर्ले–पारगड रस्ता) सुधारणा कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. रस्ता सुस्थितीत केल्याबद्दल उपोषणकर्ते व स्थानिक नागरिकांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, स्थानिक आमदार, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

ग्रामस्थांनी याबाबत भावना व्यक्त करताना सांगितले की, "आमच्या आंदोलनाची व मागणीची दखल घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावले. यामुळे किल्ले पारगड वासिय तसेच शिव भक्तांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे." आता राखडलेलं काम पुर्ण करून देण्याची मागणी पारगड वासियांनातून होते आहे.

१५ कोटी निधीची मागणी

रस्त्याचे उर्वरित काम अधिक दर्जेदार व वेगाने पूर्ण व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार दीपकभाई केसरकर यांच्याकडे १५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. हा निधी तातडीने मंजूर करून काम पूर्ण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गेले दशकभर हे काम राखडले असताना शिवप्रेमितुन नाराजी व्यक्त होतं आहे.

उर्वरित २ कि.मी. काम पूर्ण करण्याची अपेक्षा

सध्या या प्रकल्पात चंदगड तालुक्यातील केवळ २ किलोमीटरचा रस्ता अपूर्ण आहे. या भागात कोणतीही तांत्रिक अडचण नसल्याने आमदार शिवाजीराव पाटील यांनी पुढाकार घेऊन हा टप्पा त्वरित पूर्ण करावा, अशी मागणी तेथील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. तर ग्रामस्थांनी झालेल्या कामाबाबत व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकार यानी राज्याचे बांधकाम मंत्री यांचे लक्ष वेधल्या बद्दल समाधान व्यक्त केले असून आता यात सातत्य राखण्याची मागणी केली आहे. "प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. उर्वरित २ कि.मी. काम आणि निधी मंजुरीचा प्रश्न सुटल्यास संपूर्ण पंचक्रोशीचा विकास अधिक वेगाने होईल." अशी अपेक्षाही व्यक्त केली जातं आहे.