सोमवारी दोडामार्ग बाजारपेठ बंदची हाक

धर्मरक्षण व गोवंश हत्येविरोधातील आंदोलनाला पाठिंबा
Edited by: संदीप देसाई
Published on: October 05, 2025 21:25 PM
views 1047  views

दोडामार्ग : हिंदू धर्मरक्षणासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी ६ ऑक्टोबरला दोडामार्ग बाजारपेठ बंद ची हाक देण्यात आलीय. मुख्य बाजारपेठेत पिंपळेश्वर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दोडामार्ग यांच्या फलकावर ही बंदची हाक देण्यात आली आहे.

नगराध्यक्ष चेतन चव्हाण, दीपक गवस तसेच अन्य ५० ते ६० हिंदू धर्मरक्षक कार्यकर्त्यांवर अलीकडेच पोलिसांनी कारवाई केली. यातील चेतन चव्हाण दीपक गवस यांसह अन्य १५ ते १६ जण न्यायालयीन कोठडीत आहेत. या कारवाईचा निषेध नोंदवत, त्यांनी केलेले गोवंश हत्या रोखल्या जाव्यात यासाठीचे आंदोलन योग्य असल्याचे अनेक हिंदू बांधवांचे मत आहे.

या पार्श्वभूमीवर दोडामार्गमधील सर्व व्यापाऱ्यांना, नागरिकांना आणि युवक बांधवांना सोमवारच्या या बंदमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयाबाबत सर्व व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असून, धर्मरक्षणाच्या भूमिकेला व्यापक पाठींबा मिळत असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, या बंदच्या आवाहनाचे फलक दोडामार्ग येथील पिंपळेश्वर चौकात लावण्यात आले आहेत.