'विदयादायिनी प्रतिष्ठान' दोडामार्गचा शिशुमेळावा

Edited by: लवू परब
Published on: March 31, 2026 15:37 PM
views 18  views

दोडामार्ग :  विदयादायिनी प्रतिष्ठान' दोडामार्ग आयोजित शिशुमेळावा कार्यक्रम रविवारी श्री खंडोबा देवस्थान सभागृह सरगवे झरे २ मान्यवर , शिक्षणप्रेमी, शिशू आणि पालकवर्ग, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी गोवा राज्य मराठी अकादमी अध्यक्ष अनिल सामंत, गणेश विद्यामंदिर म्हापसा मुख्याध्यापक रूपेश सावंत, विदयादायिनी प्रतिष्ठान अध्यक्ष रामदास मणेरीकर,सचिव समीर  घाडी, सहखजिनदार सज्जन गवस झरे सरपंच श्रुती देसाई आदी प्रतिष्ठानचे पदाधिकारी,शिक्षणप्रेमी,पालकवर्ग आणि शिशु वर्ग उपस्थित होते.

या शिशुमेळाव्यात भारतीय विचार आणि तत्वज्ञानावर आधारित नव्या शिक्षणपध्दतीनुसार पुर्व प्राथमिक अंगणवाडी व बालवाडी शिक्षणातील विविध प्रयोग हे  उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शैक्षणिक प्रगती म्हणजे केवळ बौध्दिक विकास नव्हे. केवळ लेखन, वाचन नव्हे. प्रयोगशाळा, स्वयंपाकघर, चित्रशाळा, कलाशाळा, कार्यशाळा, रंगमंच, बाग, प्रदर्शनी, तरण तलाव, प्राणि संग्रहालय, वस्तू-संग्रहालय, क्रीडांगण आदींचा वापर करून अंगणवाडी, बालवाडी व पूर्व प्राथमिक स्तरावर शिक्षण दिल्यास, सर्व अंगांनी शैक्षणिक विकास कसा होईल हे समजून घेण्यासाठी शिशू आणि पालकवर्गासाठी या शिशुमेळाव्याचे आयोजन विदयादायिनी प्रतिष्ठान दोडामार्ग यांच्यातर्फे करण्यात आले होते.

येत्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाच्या प्रवाहात नव्याने सामील होणाऱ्या शिशुंसाठी एक नवीन आणि नव्या शैक्षणिक धोरणास समरूप अशी शिशुवाटिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या मेळाव्यात दिली. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक गोवा राज्य मराठी अकादमी अध्यक्ष, विद्याभारती अध्यक्ष तथा सारस्वत विद्यालय म्हापसा चे निवृत्त प्राचार्य अनिल सामंत यांनी  पूर्वप्राथमिक शिक्षणासाठीचे आवश्यक  बाबी याबाबतचे सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गोवा राज्य शिक्षण परिषद व नवीन शैक्षणिक धोरण राज्यसमन्वयक आणि श्री गणेश विद्यामंदिर म्हापसा मुख्याध्यापक रुपेश सावंत यांनी नव्या शैक्षणिक धोरणात समाविष्ट करण्यात आलेल्या बदलांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यादायिनी प्रतिष्ठान उपाध्यक्ष प्रिती गोलम यांनी केले.