तालुक्याच्या विकासाचा ‘नवस’ फेडण्याची वेळ : वैभव इनामदार

Edited by: संदीप देसाई
Published on: March 09, 2026 16:39 PM
views 19  views

दोडामार्ग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडून आता तर पंचायत समिती सभापती उपसभापती पदावर नवनिर्वाचित सदस्य विराजमान झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी मतदारांकडून विकासाची आश्वासने देण्यात आली होती. त्याअनुषंगाने तालुक्याच्या विकासाचा ‘नवस’ फेडण्याची वेळ आता आली असल्याचे मत दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते वैभव इनामदार यांनी व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी समाज माध्यमातून तालुक्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काही मूलभूत प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गेली २५ वर्षे हत्ती व इतर वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान, हा गंभीर प्रश्न कायम आहे. तसेच तिलारी धरण परिसराचा विकास करून रोजगारनिर्मितीला चालना देणे आवश्यक आहे. याशिवाय आडाळी MIDC येथे उद्योग सुरू करण्याबाबत अनेक वर्षांपासून आश्वासने दिली जात आहेत. या ठिकाणी तातडीने उद्योगांना परवानगी देऊन रोजगारनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणीही त्यांनी केली. तालुक्यातील आरोग्य सुविधा मजबूत करणे, तसेच धरणाजवळील गावांमध्येही पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच तालुक्यातील युवा पिढीमध्ये वाढत चाललेले अमली पदार्थांचे व्यसन ही चिंतेची बाब असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कठोर कारवाई करावी, यासाठी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घ्यायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. हे तालुक्याचे मूलभूत प्रश्न नवनिर्वाचित सदस्य व लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी इशारा दिला की, हे प्रश्न प्रलंबित राहिल्यास सामाजिक कार्यकर्त्यांना पुन्हा उपोषण व आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.