
सावंतवाडी : इन्सुली पंचायत समिती मतदारसंघातील राजकीय रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून अपक्ष उमेदवार योगेश केणी यांनी इन्सुलीत आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली चरणी नतमस्तक होऊन प्रचाराचा शुभारंभ केला. तसेच अन्य प्रमुख ठिकाणीही भेटी दिल्या. योगेश केणी यांच्या प्रचाराला रोणापाल, निगुडे गावासह आता इन्सुली गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. इन्सुलीत प्रत्येक घरोघरी जात त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत युववर्गाचा सहभाग मोठा होता.

मतदारसंघातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा त्यांच्या प्रचारात लक्षणीय सहभाग दिसून येतो. आपण एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता असून जनतेशी आपली नाळ जोडलेली आहे असे सांगत योगेश केणी यांनी विकासाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवले. मतदारसंघातील रस्ते, आरोग्य प्रश्न मार्गी लावणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद करत आपल्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला.










