
सावंतवाडी : कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील विरोधकांकडून चुकीची माहिती देत माझ्यावर टीका केली जात आहे. माझ्या शिक्षणावर ते गेलेत. २०१७ ला देखील मी ॲडव्होकेट होतो. मुंबई विद्यापीठातून मी पदवी घेतली असून तेव्हा देखील मी शिक्षण लावल. मात्र, पदवी लावून कधी मिरवलो नाही. त्यामुळे माझ्या पदवीवर बोलणाऱ्या विरोधकांनी माझं सर्टिफिकेट वाचून दाखवलं तर त्यांचा जाहीर सत्कार करेन अस आव्हान अपक्ष उमेदवार ॲड. मायकल डिसोजा यांनी दिल. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डिसोजा म्हणाले, कोलगाव मतदारसंघात हुकुमशाही सुरू आहे. ही परिस्थिती बघता लोकांत रोष आहे. या हुकुमशाही विरोधात सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे. त्यामुळेच माझ्या शिक्षणावर बोललं जात आहे. खोटी अन् चुकिची माहिती देण्याच काम सुरू आहे. तसेच आमच्याकडे ५ कार्यकर्ते असले तरी १०० कौरवांवर ते भारी आहेत. आमचे कार्यकर्ते एकनिष्ठ व स्वाभिमानी आहेत असं मत व्यक्त केले.
दरम्यान, पक्ष बदलण्याच्या निष्ठेच्या गोष्टी कुणी करू नये. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करू नये असा टोला हाणला. तसेच यांच्या घरात किती पद आहेत ? हे त्यांच्याच जाहीरनाम्यातून सांगितल आहे. त्यामुळे मी वेगळं जाहीर करण्याची गरज नाही. यापुढे आमच्यावर नाहक टीका झाल्यास आम्हालाही सगळ काही बाहेर काढावं लागेल असा टोला त्यांनी हाणला. सर्वसामान्य लोक हीच माझ्या मागे असणारी अदृश्य शक्ती आहे. माझ्या पाठीशी लोकांची शक्ती आहे. एवढंच नव्हे तर दैवीशक्ती सुद्धा आमच्या मागे आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, माजी सरपंच शिवदत्त घोगळे, माजी उपसरपंच मनोहर ठिकार, ग्रामपंचायत सदस्य रोहीत नाईक आदी उपस्थित होते.










