
दोडामार्ग : माटणे जिल्हा परिषद मतदारसंघाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच आपण ही निवडणूक लढवत असल्याचे महायुतीचे उमेदवार दीपक गवस यांनी स्पष्ट केले. प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना त्यांनी, “प्रतिस्पर्धी कोणीही असो, विजय महायुतीचाच होणार,” असा ठाम विश्वास व्यक्त केला. माटणे मतदारसंघातील जनता विकासाभिमुख नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगत गवस यांनी रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण व इतर पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले. केंद्रात भाजपा, तसेच राज्य व जिल्ह्यात महायुतीची सत्ता असल्याने स्थानिक विकास कामांना अधिक गती मिळेल आणि निधीच्या अडचणी येणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दीपक गवस यांच्या प्रचारासाठी भाजप व शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने मैदानात उतरले असून, मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान मिळणारा प्रतिसाद पाहता माटणे मतदारसंघात महायुतीच्या विजयाचा विश्वास अधिक दृढ होत चालल्याचे बोलले जात आहे.










