
दोडामार्ग : जंगलातून शेतात आलेल्या एका भल्या मोठ्या जंगली गवारेड्याचा कठडा नसलेल्या शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. ही घटना माटणे वरचीवाडी परिसरात घडली.
सखाराम हरिश्चंद्र गवस हे आपल्या काजू बागेत साफसफाईसाठी गेले असता त्यांना विहिरीत गवारेड्याचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलीस पाटील यांना दिली. त्यानंतर दोडामार्ग वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक पाहणीत गवारेडा तीन ते चार दिवसांपूर्वी विहिरीत पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती. या विहिरीत काही प्रमाणात पाणी असल्याने गवारेड्याला बाहेर काढण्याचे काम अडचणीचे ठरत होते. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मृत गवारेड्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी माटणे वरचीवाडी येथील ग्रामस्थ तसेच पोलीस पाटील यांनीही सहकार्य केले.










