
देवगड : शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी चेअरमन आणि शिक्षणप्रेमी कै.ॲड. शिवाजी साटम (भाई) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरांजलीचा कार्यक्रम नुकताच शिरगाव हायस्कूलच्या सभागृहात भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी साटम कुटुंबियांच्या वतीने शाळेच्या वर्गखोली नूतनीकरणासाठी १ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. या श्रद्धांजली सभेसाठी संस्थेचे अध्यक्ष अरुणभाई कार्ले, कार्याध्यक्ष ॲड. पी. व्ही. साटम, उपाध्यक्ष संभाजी साटम, उपाध्यक्ष विजय जाधव सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, खजिनदार. फाटक, शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, संस्था पदाधिकारी, शाळा समिती सदस्य, साटम कुटुंबीय, शिक्षक वृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थितांनी कै. शिवाजी साटम यांच्या आठवणींना उजाळा दिला.संस्थेच्या जडणघडणीत आणि शाळेच्या प्रगतीत शिवाजीभाईंचे योगदान मोलाचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून कै.शिवाजी साटम यांचे धाकटे बंधू आणि संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. पी. व्ही. साटम यांनी आपल्या कुटुंबियांच्या वतीने शाळेतील वर्ग खोल्यांच्या नूतनीकरणासाठी १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष अरुणभाई कार्ले यांच्याकडे सुपूर्द केला. साटम कुटुंबियांनी दुःखद प्रसंगीही सामाजिक बांधिलकी जपत शाळेसाठी केलेल्या या मदतीबद्दल संस्थेच्या वतीने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.










