मुख्यालयी राहत नसतानाही घरभाडे भत्ता..?

महादेव परब यांची तक्रार
Edited by: लवू परब
Published on: December 29, 2025 10:57 AM
views 347  views

दोडामार्ग : पंचायत समिती दोडामार्ग गटातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत ग्रामसेवक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना शासन निर्णयानुसार मुख्यालयी राहत नसतानाही १ जानेवारी २०२२ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत घरभाडे भत्ता अदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप सासोली येथील महादेव नकुळ परब यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ५ मे २०१९ च्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असून त्याबाबत ग्रामसभेचा ठराव आवश्यक आहे. मात्र माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीत असे कोणतेही ग्रामसभा ठराव पंचायत समिती स्तरावर उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तरीही ग्रामसेवकांना घरभाडे भत्ता देण्यात आल्याने आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आवश्यक चौकशी न करता भत्ते अदा केल्याचा ठपका तत्कालीन अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी करण्यात आलेली शिफारसही संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी नियमबाह्य दिलेला भत्ता वसूल करून संबंधितांवर शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून, जिल्हा परिषद प्रशासनाची भूमिका काय असते याकडे लक्ष लागले आहे.