
दोडामार्ग : तीन तास श्रमदान आणि संकलित झाला तब्बल २०० किलोहून अधिक प्लास्टिक कचरा, हे घडलं आहे ग्रुप ग्रामपंचायत आडाळी - फोंडीये च्या प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेत. ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्त्याच्या दुतर्फा असलेला व घरांच्या भोवतीचा कचरा गोळा केला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे औचित्य साधून आडाळी सरपंच पराग गांवकर यांच्या नेतृत्वाखाली 'एक रविवार स्वच्छ, समृद्ध, सुशोभित गावासाठी' हा उपक्रम गेले तीन रविवार सुरु आहे. यावेळी गावातील घरांच्या आसपासचा व मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा पडलेला प्लास्टिक कचरा संकलन करण्यासाठी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने गावातील युवक, महिला व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुमारे तीन तास सलग श्रमदानं करून तब्बल 61 गोण्या म्हणजे सुमारे 200 किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.
आडाळी जिल्हा परिषद शाळा नं 1 व कोसमवाडी शाळा नं 2 च्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरा संकलित केला. कोसमवाडी शाळेच्या रुद्र नाईक या विद्यार्थ्यांने घर व रस्ता परिसरातील तब्बल सहा गोण्या प्लास्टिक कचरा संकलित केला. ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाबद्दल सरपंच श्री. गावकर यांनी आभार मानले.










