
दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेत शुक्रवारी दुपारी विचित्र अपघात घडला. दोन वाहनांच्यामधून स्कुटर चालक मार्ग काढत असताना मागून येणाऱ्या एका डंपरने स्कुटरला धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून, त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे.
दोडामार्ग बाजारपेठेत नगरपंचायतीचा कचरा संकलन करणारा ट्रॅक्टर उभा होता. तर दुसऱ्या बाजूला कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो उभा होता. यावेळी एक युवक या दोन्ही वाहनांच्या मधून दुचाकी नेत असताना मागून येणाऱ्या एक डंपरने स्कूटरला धडक दिली. या धडकेमुळे स्कुटर चालक थेट बाजूला उभ्या असलेल्या नगरपंचायत ट्रॅक्टरच्या चाकाला आपटून रस्त्यावर कोसळला. मात्र ट्रॅक्टर उभा असल्याने स्कुटर चालक ट्रॅक्टरखाली जाण्यापासून वाचला आणि मोठा अनर्थ टळला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर बचाव कार्यासाठी नागरिक सरसावले. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी स्कुटर चालकाला त्वरित येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.










