पाळये परिसरात हत्तींकडून बागायतींचं नुकसान

Edited by: लवू परब
Published on: December 26, 2025 10:52 AM
views 110  views

दोडामार्ग : पाळये परिसरात पाच हत्तींच्या कळपाने मोठा उपद्रव केला आहे. या हत्तींनी शेतकरी गणपत दळवी यांच्या केळी, नारळ आणि सुपारीच्या बागायतींचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे दळवी यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

गणपत दळवी हे मुंबईत पोस्ट खात्यात मोठ्या पदावर काम करून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या मूळ गावी पाळये येथे येऊन केळी, नारळ, सुपारी आणि बांबूची लागवड केली होती. त्यांची शेती इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत होती. मात्र बुधवारी रात्री अचानक पाच हत्ती त्यांच्या बागायतीत शिरले. हत्तींनी नारळाची झाडे मुळासकट उपटली आणि केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सकाळी पाहिल्यावर संपूर्ण बाग उद्ध्वस्त झालेली दिसत होती. या घटनेमुळे केवळ गणपत दळवीच नव्हे, तर परिसरातील इतर शेतकरीही घाबरले आहेत. हत्ती वारंवार येत असल्यामुळे शेती कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. रात्री भीती आणि दिवसा नुकसानीची चिंता अशी त्यांची अवस्था झाली आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. हत्तींच्या कळपाला जंगलात परत पाठवावे आणि झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.