
दोडामार्ग : अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर महसूल विभागाने कसई येथे कारवाई केली. त्याला तब्बल १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. मागील दहा दिवसांत वाळू वाहतूक करणाऱ्या तीन डंपर वर या विभागाने कारवाई केली. मात्र स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खडी वाहतुकीवर या विभागाची नेमकी कारवाई होणार का? असा सवाल मात्र आता उपस्थित होत आहे.
एक डंपर सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाळू घेऊन बांदा ते कसई-दोडामार्ग जात होता. यावेळी झोळंबेचे तलाठी श्रीराज सांबारी यांनी सोमवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास तो डंपर तपासणीसाठी थांबविला व चालकाकडे वाळू वाहतुकीच्या पास बद्दल विचारणा केली. पास नसल्यामुळे त्यांनी तो तहसील कार्यालयात आणला. वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी डंपर मालकाला १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. मागील दहा दिवसात महसूल विभागाने तीन वाळू वाहतुकीच्या डंपर वर कारवाई केली आहे.
अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाईसाठी महसूल विभागाचे भरारी पथक असल्याचे तहसीलदार राहुल गुरव यांनी सांगितले. मात्र अलीकडच्या काही दिवसात झालेल्या कारवाईवरून हे पथक केवळ रात्रौच्यावेळी फक्त वाळू वाहतुकीवर कारवाई करत असल्याचे दिसून येते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात १० चाकी वाहनातून काळ्या दगडांची अवैध वाहतूक होते. शिवा ही वाहतूक तहसील कार्यालयाच्या समोरून व महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून दिवसरात्र केली जाते. यापैकी एका डंपरवर दहा दिवसांपूर्वी महसूलने कारवाई केली. त्यानंतर लागलीच सायंकाळी तात्काळ तहसील कार्यालयात गौण खनिज व्यावसायिकांची एक बैठकही संपन्न झाली. त्यानंतर मात्र या भरारी पथकाने अद्याप पर्यंत स्थानिक अशा दगडाच्या कोणत्याही वाहनावर कारवाई का केली नसावी? त्या बैठकीत नेमके असे काय घडले असावे? हे मात्र गुलदस्त्यात आहे.










