कोनाळकट्ट्यात ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

प्रदर्शनातून देण्यात नवनिर्मितीसाठी प्रेरणा देण्याचा संदेश
Edited by:
Published on: December 09, 2025 19:34 PM
views 91  views

दोडामार्ग : तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळ-कोनाळकट्टा यांच्या वतीने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. विज्ञान विषयाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करून नवनिर्मितीसाठी प्रेरणा देण्याचा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शैलेश सुरेश दळवी यांच्या हस्ते झाले. सचिव श्रीम. स्वाती नाईक, संचालक विलास नाईक व  सुधाकर बांदेकर, सरपंच कोनाळ श्रीम. अस्मिता अनिल गवस, गटसमन्वयक सूर्यकांत नाईक, उपसरपंच  रत्नकांत कर्पे, गटशिक्षणाधिकारी  नासिर नदाफ, मुख्याध्यापक विश्वनाथ सावंत, केंद्रप्रमुख  सुधीर जोशी, श्रीम. अंजली जोशी, संतोष गवस, काळे, दोडामार्ग तालुका पत्रकार संघ अध्यक्ष  रत्नदीप गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माध्यमिक मुख्याध्यापक तालुकाध्यक्ष नंदकिशोर म्हापसेकर, माध्यमिक शिक्षक भारती संघटना तालुकाध्यक्ष अरुण गवस, जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष आनंद बामणीकर, छाबी तूळसकर तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी श्री. नासिर नदाफ म्हणाले की, “विज्ञान विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचा बनवण्याचे श्रेय विज्ञान शिक्षकांना आहे. स्वप्ने तीच खरी जी झोप उडवतात. विज्ञान हा जीवनातील महत्त्वाचा घटक आहे.

अध्यक्षीय भाषणात श्री. दळवी म्हणाले की, “जगात ज्यांनी विज्ञानात प्रगती केली तीच राष्ट्रे सक्षम झाली. चीन व अमेरिका याचे उत्तम उदाहरण. डॉ. विक्रम साराभाई व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी पुढे यावे.”

कार्यक्रमात विविध शास्त्रीय दालनांचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक आनंद बामणीकर यांनी केले. तर मनोगत श्री. म्हापसेकर,  सूर्यकांत नाईक, विठ्ठल गवस, श्रीम. अस्मिता गवस व श्री. नदाफ यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ सावंत यांनी मानले. दरम्यान, गटविकास अधिकारी श्री. अजिंक्य सावंत,साहाय्यक बीडीओ यशवंत गवस  यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक उपक्रमांचे कौतुक केले.