
दोडामार्ग : सत्य आणि अहिंसेचे तत्व अंगीकारणाऱ्या महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत “चरखा” आणला आणि ब्रिटिश साम्राज्य हादरले. देशभर सूत कताई सुरु झाली आणि ब्रिटिशांच्या अर्थकारणाला मोठा धक्का बसला. चरखा हे स्वावलंबनाचे आणि स्वदेशीचे प्रतीक ठरले.
याच चरख्याची ओळख मुलांना व्हावी, स्वावलंबनाचे धडे मिळावेत आणि स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जाणून घ्यावा या उद्देशाने आडाळी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्लोब ट्रस्टचे अध्यक्ष पराग गावंकर यांच्या पुढाकाराने येथील प्राथमिक शाळेत “चरख्यातून सूत कताई” हा उपक्रम सुरु करण्यात आला.
गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गांधीवादी विचारांचे अभ्यासक व मनोविकार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर, चरखा प्रशिक्षक गोरक्ष परब आणि सरपंच पराग गावंकर उपस्थित होते.
गावंकर यांनी शाळेला चरखे भेट देऊन मुलांना स्वावलंबनाची प्रेरणा दिली. उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी सुमारे पंचवीस मीटर धागा तयार करून गांधींना आदरांजली वाहिली. भाषणांच्या ऐवजी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी सांगत दिवस साजरा केला. डॉ. रुपेश पाटकर यांनी चरख्याचे गांधींच्या जीवनातील आणि स्वातंत्र्य चळवळीतले महत्त्व समजावून सांगितले. मुख्याध्यापिका सायली देसाई, सहायक शिक्षक रामदास पावरा व दर्शना केसरकर यांनी प्रशिक्षक गोरक्ष परब यांच्या सहकार्याने सूत कताई प्रशिक्षणाची सुरुवात केली.










