
दोडामार्ग : तिलारी परिसरात गोमांस वाहतूक संशयावरून झालेल्या मारहाण व कार जाळपोळ प्रकरणातील अटक केलेल्या पाच संशयित आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मंगळवारी सावंतवाडी येथील न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते.
गोव्यातील एक युवक गुरुवारी दुपारच्या सुमारास घाटमाथ्यावरून दोडामार्ग मार्गे गोव्याला जात होता. विजघर येथील चेक पोस्टवर त्याची कार आली असता, पोलिसांनी ती तपासणीसाठी थांबवली होती. यावेळी कार मध्ये पोलिसांना मांस आढळून आले. पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावंत हे वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील चौकशीसाठी त्याला दोडामार्ग पोलीस ठाण्याकडे आणत होते. तिलारी पाताडेश्वर येथे ते आले असता काहींनी त्यांची गाडी अडवली होती व त्या व्यक्तीवर गोमांस वाहतूक करत असल्याचा संशय घेत बेदम मारहाण केली होती. आणि त्यानंतर त्याची कार पेटवून दिल्याची घटना घडली होती.
या गंभीर घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावंत यांनी तक्रार दाखल करून ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भाजपा नगराध्यक्ष व तालुका मंडल अध्यक्षांसह पाच संशयितांना अटक केली होती. शुक्रवारी त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा मंगळवारी या संशयित आरोपींना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. इतर आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. फरार संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी शोध घेत आहेत.










