
दोडामार्ग : शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या आत्मा (ATMA) कमिटीच्या अलीकडेच झालेल्या निवड प्रक्रियेत दोडामार्ग तालुक्यातून अनुभवी टीम निवडली गेली आहे. झोळंबे गावाचे माजी सरपंच राजेश गवस यांची दोडामार्ग तालुका आत्मा कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून केर गावचे माजी सरपंच आणि आत्मा कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांची सिंधुदुर्ग जिल्हा आत्मा कमिटीचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. शेतकऱ्यांच्या शाश्वत शेती विकासासाठी मार्गदर्शन, योजना राबविणे व नवनवीन तंत्रज्ञान पोहोचविणे हे आत्मा समितीचे मुख्य कार्यक्षेत्र आहे. राजेश गवस यांना सरपंचपदाचा अनुभव असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकविषयक प्रश्न आणि कृषीविषयक धोरणांची प्रत्यक्ष जाण त्यांना आहे. याच अनुभवाच्या जोरावर ते कमिटीच्या अध्यक्षपदी अधिक प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, प्रेमानंद देसाई यांनी यापूर्वीही आत्मा कमिटीच्या कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांना शेतकरी बांधवांच्या गरजा आणि अपेक्षा जवळून समजल्यामुळे जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते अधिक परिणामकारक कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या नव्या निवडीच्या निमित्ताने दोडामार्ग तालुका शिंदे शिवसेनेतर्फे राजेश गवस आणि प्रेमानंद देसाई यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी शैलेश दळवी, तीलकांचन गवस, बाळा नाईक, भगवान गवस, दादा देसाई, ज्ञानेश्वर शेटवे, बबलू पांगम, सुनील गवस, अमर राणे, शेटये, आप्पा गवस आदिसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाला साजेसा न्याय देत शेतकऱ्यांच्या हितासाठी नवे प्रकल्प राबवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी
प्रेमानंद देसाई यांनीही आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. “शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आणि आत्मा समितीमार्फत शेतकऱ्यांपर्यंत नवीन कृषी तंत्रज्ञान पोहोचवणे हेच आमचे प्राधान्य असेल,” अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.










