
दोडामार्ग : आजच्या सोशल मीडिया आणि रेकॉर्ड डान्सच्या चकचकीत जमान्यात आडाळी प्राथमिक शाळेच्या मुलींनी कोकणातील अस्सल लोककलेला नवा श्वास दिला आहे. पारंपरिक फुगडी नृत्यातून या लहानग्या विद्यार्थिनींनी ज्येष्ठ महिलांच्या तोडीस तोड असा ठेका धरत लोकसंगीत व लोकनृत्य परंपरेचा झेंडा उंचावला आहे.
गेल्या काही वर्षांत मोबाईलवरील रिल्स, नवे डान्स स्टाईल्स आणि वेस्टर्न म्युझिकच्या झपाट्यातून लोककलेवरील संस्कार हरवत चालले आहेत. पण आडाळी प्राथमिक शाळेतील दुसरी ते पाचवीतील मुलींनी मात्र मौखिक परंपरेतून आलेली फुगडीची कला आत्मसात करून वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. कळणे माऊली मंदिरात गेल्या नवरात्रोत्सवात अंकिता शिंदे, सिया गवस, स्वरा खरात, तन्वी गांवकर, लीला बोर्डेकर, धनश्री गांवकर, भूमी परब, रुदवी परब, जीविका पावरा, हंसिका गांवकर, राजनंदिनी गांवकर या विद्यार्थिनींनी केलेल्या फुगडी सादरीकरणाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यंदाही कुंब्रल शांतादुर्गा व मोरगाव माऊली मंदिर येथे त्यांच्या नृत्याने भाविक मंत्रमुग्ध झाले.
परंपरागत गाणी, देशी ठेका, पारंपरिक वेशभूषा या सर्व घटकांनी सजलेल्या त्यांच्या फुगडीतून कोकणातील लोकसंगीताची खरी ओळख झळकते. शाळेच्या मुख्याध्यापिका सायली देसाई, शिक्षक दर्शना केसरकर व रामदास पावरा यांचे मार्गदर्शन, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेघा गांवकर, उपाध्यक्ष आरती गांवकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल परब, उदय गांवकर, उमेश बोर्डेकर यांचा उत्साही सहभाग या मुलींना सतत प्रोत्साहित करतो.
यामागील संकल्पना व सातत्यपूर्ण पाठिंबा सरपंच पराग गांवकर यांचा असल्याने शाळेतील अशा उपक्रमातून मुलांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. आडाळी शाळेच्या या लहानग्या कलाकारांनी दाखवून दिले आहे की, लोककलेचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी केवळ पिढी बदलणे आवश्यक नाही; तर परंपरेवर प्रेम आणि सातत्यपूर्ण जपणूक याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.










