
दोडामार्ग : दोडामार्ग कार जाळपोळ प्रकरण व कार चालकाला करण्यात आलेली मारहाण हे सर्व अत्यंत निंदनीय आहे. जिल्ह्यात हिंदू - मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत आणि हे प्रकार मंत्री नितेश राणे यांच्यामुळेच सुरू असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.
दोडामार्ग इथं आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा चिटणीस सुभाष दळवी, यांसह लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, भिवा गवस, मिलिंद नाईक, संदेश वरक, शुभम देसाई आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा शांत व कायद्याला मानणारा जिल्हा म्हणून राज्यभर ओळख होती. मात्र, राज्यात महायुती सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर व प्रामुख्याने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे झाले तेव्हापासून जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणच्या युवकांना भडकावण्याचं काम पालकमंत्रीच करत असल्याचा आरोप बाबुराव धुरी यांनी केलाय.
पोलिस प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न येता आपले काम करावे. शिवाय सत्तेला घाबरून जर पोलिस प्रशासन कोणाला पाठीशी घालत असेल तर महाविकास आघाडीमार्फत आंदोलन छेडले जाईल असही धुरी यांनी सांगितले.
हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण
धुरी पुढे म्हणाले, “नितेश राणे हिंदुत्वाचा डंका पेटवत फिरतात, पण खरी भूमिका केवळ राजकीय स्वार्थ साधण्याची आहे. हिंदू-मुस्लिम यांच्यात तणाव निर्माण करण्यासाठी ते करत असलेली प्रक्षोभक भाषणे कारणीभूत आहेत. काही ठिकाणी इमारती पाडण्यापर्यंतचे प्रकार घडत आहेत,” असा आरोपही धुरी यांनी केला.
आपल्या युवकांनी आपल्या करियरकडे लक्ष द्यावे, नको त्या अडचणींमध्ये सहभागी होऊ नये असं आवाहन यावेळी संजय गवस यांनी केलंय.
आमदार केसरकरांनी मौन सोडावे : बाबुराव धुरी
सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर पूर्वी नारायण राणे कुटुंबावर दादागिरीचे आरोप करत होते. मात्र, युती सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांनी मौन बाळगले आहे. दोडामार्गातील हिंसाचारावर आमदार म्हणून ते का बोलत नाहीत? त्यांनी गप्प न बसता आपली भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी धुरी यांनी केली.










