
दोडामार्ग : गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून तिलारी येथील पाताडेश्वर मंदिराजवळ एका तरुणावर हल्ला करून त्याला जखमी केले. निजामुद्दीन मोहम्मद सय्यद कुरेशी असे जखमीचे नाव असून त्याची कारही जाळली. याप्रकरणी पोलिसांनी ५० ते ६० जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावंत यांनी दिली असून भाजपा दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपक गवस, भापजा दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांसह, महेंद्र खरवत, वैभव रेडकर व विजय कांबळे चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. येथील न्यायालयात त्यांना हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन मोहम्मद सय्यद कुरेशी हा तरुण गुरुवारी दुपारच्या सुमारास त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कारमधून तिलारी घाटमाथ्यावरून दोडामार्गच्या दिशेने येत होता. वीजघर चेकपोस्ट येथे तो आला असता पोलिसांनी त्याची कार तपासणीसाठी थांबवली. यावेळी त्याच्या कार मध्ये बकरासदृश प्राण्याचे मांस आढळून आले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार, पोलीस कॉन्स्टेबल परशुराम गंगाराम सावंत हे पुढील चौकशीसाठी त्याला दोडामार्ग पोलिस ठाण्याकडे आणत असताना, तिलारी येथील पाताडेश्वर मंदिराजवळ ५० ते ६० जणांनी वाहनांनी रस्ता अडवला व पोलिसांच्या शासकीय कारवाईत अडथळा निर्माण केला. जमावाने गाडीवर पेट्रोल टाकून आग लावली.
या घटनेदरम्यान, फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावंत हे शासकीय गणवेशात आणि कर्तव्यावर असताना व जमावाला हे माहिती असताना देखील त्यांचीही अडवणूक करून कायदेशीर कामात अडथळा आणला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावंत यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांसह महेंद्र खरवत, वैभव रेडकर, विजय कांबळे व इतर ५० ते ६० अज्ञात इस्मान विरुद्ध भारतीय न्यायसंहिता १८९(२), १८९(३), १८९(४), १९१(१), १९१(२), १९१(३), १९५, ११८(२), ११७(२), १०९(१), १३२, ३२६ (एफ), १२१(१), १२६(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३७(१), ३७(३) व १३५ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










