जिल्ह्यात कायदा - सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही : बाबुराव धुरी

Edited by:
Published on: September 26, 2025 12:36 PM
views 384  views

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून हिंदू - मुस्लिम वादाच्या नावाखाली अनेक गंभीर घटना घडत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केला आहे. गोमांस वाहतूक प्रकरणी वाहनचालकांना मारहाण, गाड्या फोडणे व जाळणे अशा घटना सातत्याने होत असून, या प्रकरणांची चौकशी आजतागायत अपूर्ण आहे, असे त्यांनी नमूद केले.

“गोमांस वाहतुकीचे प्रकार चुकीचे आहेत; परंतु त्याचा बहाणा करून काहीजणांना मारहाण करणे, गाड्या जाळणे हा कायदा हातात घेण्याचा प्रकार असून सरकारच्याच छत्रछायेत असे प्रकार सुरु असल्याचे चित्र दिसते. या सर्व घटनांमागील सूत्रधार कोण हे उघड करण्यासाठी विशेष तपास पथकाद्वारे चौकशी व्हावी,” अशी मागणी करणार असल्याचे धुरी यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार व आरोग्य सुविधांसाठी गोव्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशा वेळी गोव्याच्या वाहनांना लक्ष्य करणे हे लोकांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे. कायदा - सुव्यवस्था कोलमडली असून पोलिस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

“गुन्हेगारांना थारा देणे तात्काळ थांबवून ठोस कारवाई करावी; अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन छेडेल.” असही धुरी यांनी सरकारला इशारा देताना सांगितले.