
दोडामार्ग : तिलारी येथे घडलेल्या चारचाकी वाहन जळीतप्रकरणी तालुका प्रमुख संजय गवस यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. गवस म्हणाले, "अशा प्रकारच्या घटनेचे समर्थन समाजातील कुणीही करणार नाही. कायदा हातात घेऊन असे प्रकार घडवणे अजिबात योग्य नाही. "कोणत्याही धर्माचा किंवा समाजाचा व्यक्ती चुकीचे कृत्य करत असेल तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. परंतु स्वतःच कायदा हातात घेऊन गाड्या जाळणे योग्य नाही. सातत्याने असे प्रकार घडल्यास दोडामार्ग तालुक्यातील जनतेबद्दल चुकीचा संदेश जाईल, याचा विचार राजकीय आणि सामाजिक पातळीवरील नेतृत्वाने करणे गरजेचे आहे. घडलेल्या घटनेचा पोलीस यंत्रणा सखोल तपास करेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो." अशी प्रतिक्रिया गवस यांनी दिली आहे.










