
दोडामार्ग : शहरातील एका २३ वर्षे युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पवन प्रशांत नाईक असे त्याचे नाव असून आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणला.
मिळालेल्या माहितीनुसार पवन प्रशांत नाईक हा मूळ रहाणार उगाडे येथील असून त्याच्या वडिलांचे दोडामार्ग येथे हार्डवेअरचे दुकान आहे. दोडामार्ग शहरातही त्यांचे घर आहे. ते आपल्या कुटुंबासमवेत दोडामार्ग येथे राहतात. बुधवारी रात्री टीव्हीवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना चालू होता. सामना संपल्यानंतर पवन याने टीवी बंद केली व झोपी गेला. घरातली सगळी झोपल्याचे पाहून मध्यरात्री तो घरातून बाहेर गेला होता. तो बाहेर गेल्याची चाहूल त्याच्या आईला लागली होती. परंतु, बराचवेळ झाला तरी परत घरात न आल्याने त्याच्या आईने जाऊन बाहेर पाहिले. यावेळी बाहेरच्या पडवीत गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. लागलीच तिने आपल्या पतीला ही घटना सांगितली. रात्रीचे सुमारे दीड वाजले होते. आरडाओरडा झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नायलॉन दोरीला लटकलेल्या स्थितीत असलेल्या पवन याच्या गळ्याचा फास सोडून पोलिसांनी त्याला दोडामार्ग रुग्णालयात दाखल केले.
मात्र, त्याचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले केले. नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावल्यानेच त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदनाअंती सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यख पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.










