
दोडामार्ग : दोडामार्ग तालुका आपल्या जैवविविधतेची प्रसिद्ध असून संशोधकांमध्ये दुसरे ऍमेझॉन म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील एक गाव झोळंबे , जे नैसर्गिक जलस्रोत आणि त्यावरील फळ बागायतीसाठी प्रसिद्ध असून बागायतदार फार्मस्टे याच गावात आहे , नुकत्याच या फार्म स्टे च्या परिसरात काही प्रदेशनिष्ठ उभयचर प्रजाती , आणि बेसुमार जंगलतोडीमुळे अस्तित्व धोक्यात असलेल्या काही उभयचर प्रजाती आढळून आल्या आहेत , अशातच आता जगातील सर्वात मोठा समजला जाणारा ऍटलास मॉथ या प्रजातीचा पतंग आढळला आहे . त्यामुळे झोळंबे गावाच्या जैवविविधतेत भर पडली आहे. पश्चिम घाटालगत असल्याने हा प्रदेश सदाहरित जंगलांनी समृद्ध असा आहे.
ऍटलास मॉथ चे दर्शन अतिदुर्मिळ असते आणि दक्षिण पूर्ण आशिया खंडामध्ये तो प्रामुख्याने आढळून येतो . प्रथमदर्शीनी फुलपाखराप्रमाणे दिसणारे परंतु हा एक पतंग आहे , फुलपाखरे आपले पंख उघड झाप करतात तर पतंगांचे पंख उघडे आणि लांबवर पसरलेले असतात.
निसर्गप्रेमी आणि अभ्यासक ओंकार गावडे , सुरज गावडे आणि विकास कुलकर्णी याना हा पतंग बागायतदार च्या परिसरात आढळून आला, बदामी तपकिरी आणि लालसर रंगाकडे जाणारा, याचा आकार १० ते १२ इंच किंवा साधारण २५ ते ३० सेमी लांबीचा असतो , पंख पसरलेले आणि मोठ्या आकाराचे आणि टोकाला नागासारखी मिळतीजुळती आकृती असते , ज्यामुळे शिकारी पक्ष्यांपासून त्याचा बचाव होतो (हे नैसर्गिक संरक्षण लाभलेले असते ) पंखांवर मोठे पांढरे ठिपके असतात आणि नकाशाप्रमाणे नक्षी मुळे त्याला ऍटलास मॉथ हे नाव आहे , असे पर्यावरण आभ्यासक श्री वरद गिरी यांनी सांगितले . नरापेक्षा मादी हि आकाराने मोठी असते , प्रजनन काळात मादी "फेरोमोन "नावाचे विशिष्ट संप्रेरक हवेत सोडते , ज्यामुळे नर मादीकडे आकर्षित होतो , या पतंगास तोंड किंवा पचनसंस्था नसते , अळी (सुरवंट ) अवस्थेतच ते पुरेसे अन्न खातात जे त्यांची वाढ होण्यास आणि प्रजननादरम्यान पुरेसे असते . या पतंगाचे आयुष्य अगदी जेमतेम ५ ते ७ दिवसाचे असते आणि प्रजननाचे कार्य संपल्यावर त्यांचा मृत्यू होतो . प्रजाननानंतर मादी पतंग एकावेळेस १०० ते २०० अंडी घालते , त्यासाठी सदाहरित फळझाडे निवडते जसे कि आंबा, पेरू, अवाकडू , लिंबू वर्गीय वनस्पती इत्यादी . , अंड्यातून दहा बारा दिवसात सुरवंट बाहेर येतो , सुरवंट ३०- ४० दिवस सतत झाडाची पाने खाऊन जगतात आणि आपल्याभोवती एक कोष तयार करतात , साधारण २१ दिवसांनी त्या कोशातून पुन्हा नवे पतंग बाहेर येतात . हा पतंग निशाचर असून रात्रीच्या वेळेस दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतात .
याआधी सभोवतालच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि दोडामार्ग मध्ये तिलारी खोऱ्यात तसेस वानोशी होम स्टे च्या परिसरात ऍटलास मॉथ आढळलं आहे .
झोळंबे आणि आजूबाजूचा भाग हा घनदाट जंगलांनी वेढलेला आहे , तसेच हनुमंतगड , घारपी येथे पठारी प्रदेशही आहे , पश्चिम घाटालगत असल्यामुळे या परिसरात फुलपाखरे आणि पतंगांच्या शेकडो प्रजाती आढळून येतात , मात्र त्याचा पुरेसा अभ्यास आणि शोध झालेला नाही त्यामुळे बरीचशी जैवविविधता हि अज्ञातात आहे मात्र अशा शोधक वृत्तीमुळे आपल्या भागाची विशेष ओळख ठळक होते.
पशु पक्ष्याना नैसर्गिक अधिवासात राहू द्या : डॉ. गिरी
पश्चिम घाट आणि जगातले दुसरे ऍमेझॉन तिलारी आणि त्यातील झोळंबे गाव हे वेस्टर्न घाट कॉरिडॉर मध्ये आहे , त्यामुळे इथे वन्यप्राण्यांची अक्षरशः रेलचेल आहे . खवले मांजर, साळींदर , पट्टेरी वाघ , बिबट्या , अस्वले यांचे दर्शन आजूबाजूस असणाऱ्या फुकेरी, खडपडे भेकूर्ली घारपी उदेली गावातील ग्रामस्थांना होताच असते , इथे औषधी वनस्पतीही मुबलक प्रमाणात आहेत , सदाहरित वने आणि फुलझाडे फळझाडे असल्याने विविध फुलपाखरांचे आणि पतंगांचे दर्शन इथे होते. नुकताच आढळून आलेला ऍटलास मॉथ हा पतंग सहसा दिसून येत नाही , तरी आढळून आल्यास नागसाप आहे किंवा कुणी अजस्त्र आहे म्हणून त्याला इजा करून नये आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात जगण्याची संधी द्यावी.










