दोडामार्ग सार्वजनिक नवरात्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

Edited by:
Published on: September 22, 2025 20:00 PM
views 611  views

दोडामार्ग :  गणेशोत्सव–नवरात्रोत्सव मंडळ, दोडामार्गतर्फे नवरात्रोत्सव २०२५ ची उत्साहात सुरुवात झाली आहे. सोमवार २२ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा सोहळा गुरुवार २ ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी गणेशायन, देवीची प्रतिष्ठापना, पूजन, आरतीने उत्सवाचा शुभारंभ झाला. संध्याकाळी भक्तिरसाने भारलेले कीर्तन व महाआरतीने वातावरण दुमदुमले.

नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक दिवशी सकाळी पूजन, आरती, ओटी भरणे, कुंकुमार्चन अशा पारंपरिक विधींसह संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. २३ सप्टेंबरला हरिनाम सप्ताह, २४ सप्टेंबरला भजन स्पर्धा, तर २५ सप्टेंबरला महिला भजन स्पर्धा पार पडणार आहे.

२७ सप्टेंबरला एम. जे. डान्स अकॅडमी ग्रुपचे खास नृत्याविष्कार सादर होतील. २८ सप्टेंबरला ‘अखिल युवा गोवा’ यांच्या वतीने “सूरांचा संगम” या संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी तर २९ सप्टेंबरला बालनृत्य स्पर्धा रंगणार आहे. ३० सप्टेंबरला श्री सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुपचा नृत्यसंगीत महोत्सव होईल. गुरुवार २ ऑक्टोबरला सकाळी महाआरती, ओटी भरणे व देवीचे विसर्जन होऊन नवरात्रोत्सवाची सांगता होईल.

या संपूर्ण कालावधीत पारंपरिक विधी, भजन, कीर्तनासोबतच नृत्य, संगीत, नाट्य आणि विविध कलांची सरमिसळ अनुभवण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव–नवरात्रोत्सव मंडळ, दोडामार्गतर्फे करण्यात आले आहे.