
दोडामार्ग : गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकच्या जंगलातून येणाऱ्या जंगली हत्तींच्या वावरामुळे दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागायती, भातशेती, केळी व फळबागा उध्वस्त झाल्या तर काही ठिकाणी हत्तींच्या हल्ल्यात जीवितहानीही झाली. या सततच्या हल्ल्यामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागले असून भीतीच्या वातावरणात दिवस काढत आहेत. नुकसान सत्र सुरूच आहे. त्यामुळे हत्ती कुठेही न्या आम्ही या निर्णयाचे स्वागतच करतो, अशी रोखठोक भूमिका मांगेली ग्रामपंचायत सदस्य व मनसेचे माजी तालुकाप्रमुख सुनील गवस यांनी मांडलीय.
सध्या दोडामार्ग, सिंधुदुर्ग मधून ओंकार हत्ती गोव्यात गेल्याने व ५ हत्तीनी दोडामार्ग मध्ये उपद्रव वाढविल्याने हा प्रश्न अजेंठ्यावर आलाय. राज्य शासनाने तालुक्यातील जंगली हत्ती पकडून खासगी प्राणीसंग्रहालय ‘वनतारा’ येथे नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर या निर्णयाचे स्वागत ग्रामपंचायत मांगेलीचे सदस्य सुनील गवस यांनी केले आहे.
सुनील गवस म्हणाले, हत्ती कुठेही घेऊन जा – पण आमच्या शेतकऱ्यांचे रोजचे नुकसान थांबले पाहिजे. शासनाने जर हे हत्ती वनतारामध्ये नेऊन सोडले तर शेतकऱ्यांचा मोठा दिलासा मिळेल. शेतकरी अनेक वर्षे नुसते नुकसान सहन करत आहेत, त्यातून त्यांना मुक्ती मिळणे गरजेचे आहे. या निर्णयामुळे कुणाचं नुकसान होत नाही, उलट शेतकऱ्यांचा जीव आणि त्यांच्या पिकांचे रक्षण होईल
ते पुढे म्हणाले की, “हत्ती पकडण्याच्या आणि स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेत शासनाने पूर्ण काळजी घ्यावी. प्राण्यांच्या सुरक्षेचा विचार करून योग्य पद्धतीने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. शासनाने ज्या अधिकाऱ्यांनी, वनविभागाने किंवा लोकप्रतिनिधींनी हा निर्णय पुढे नेला आहे त्यांचे आम्ही सर्वतोपरी अभिनंदन करतो. प्रत्येक ग्रामपंचायतींनी देखील या निर्णयाचे ठराव करून सरकारचे अभिनंदन करावे, असेही त्यांनी नमूद केलं आहे. दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या संख्येत गेल्या दशकभरात वाढ झाली असून, वनविभागाला अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या. वारंवारच्या हल्ल्यांमुळे, नुकसानीमुळे आणि आता हत्ती माणसांचे बळी घेऊ लागल्याने सारेच हतबल आहेत. त्यामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याला दिलासा देणारा असल्याचे सुनील गवस यांनी स्पष्ट केले.










