
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून स्थिरावलेल्या जंगली हत्तींबाबत सुरु असलेल्या हालचालींवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर थेट टीका करत “नैसर्गिक अधिवासातील हत्ती ‘वनतारा’ला विकण्याचा ठेका केसरकरांना कोणी दिला?” असा जळजळीत सवाल उपस्थित केलाय. नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या हत्तींना विकण्याचे धाडस कुणी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आमदार केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “सिंधुदुर्गातील वन्य हत्तींपासून गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे आणि पिकांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे. हे नुकसान रोखण्यासाठी योग्य तो मार्ग काढणे गरजेचे आहे. ओंकारसह इतर हत्तींना पकडून ‘वनतारा’मध्ये पाठविण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी खुद्द वनमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला असून लवकरच निर्णय घेतला जाईल.” त्यांनी पुढे नमूद केले की, “सर्वोच्च न्यायालयाने वनतारामध्ये असलेले सर्व प्राणी सुरक्षित असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे तिथे नेल्यानंतर हत्तींना योग्य ती काळजी घेतली जाणार आहे.”
यावर बाबूराव धुरी यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, “सरकार आणि मंत्री हे मुकेश अंबानी यांच्या ओंजळीने पाणी पीत आहेत. त्यांना जनतेचे आणि वन्यप्राण्यांचे काही पडलेले नाही. अंबानी यांच्या खासगी ‘वनतारा’ प्राणीसंग्रहालयात हत्ती नेण्यासाठी आमदार-खासदारांकडून आटापिटा सुरू आहे. या व्यवहारात मोठी रक्कम दिली जाणार असल्याचे चित्र आहे. मात्र, हा प्रयत्न आम्ही न्यायालयात दाद मागून हाणून पाडू,” असा इशारा त्यांनी दिला.
हत्तींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने योग्य पर्याय शोधावा, मात्र नैसर्गिक अधिवासातून त्यांना खासगी प्राणीसंग्रहालयात नेण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर जिल्ह्यात चांगलाच राजकीय संघर्ष धुमसू लागला आहे.










